महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जमिनीच्या खालावणाऱ्या पोताबाबत कृषि विभागाने गांभीर्यांने पहावे -पालकमंत्री देशमुख मंगळवार, ०५ डिसेंबर, २०१७
  • मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण
सोलापूर : असंतुलित रासायनिक खतांचा वापर, मुबलक पाणी आणि पीक पद्धतीत बदल होत नसल्याने नापिकतेचे प्रमाण वाढत आहे. त्यातच नियमित माती परीक्षण केले जात नसल्याने जमिनीचे आरोग्य खालावत आहे. मृद आरोग्याचा होत असलेला ऱ्हास चिंतेचा विषय असून याकडे कृषि विभाग व शेतकऱ्यांनी गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे, असे मत पालकमंत्री विजय देशमुख यांनी व्यक्त केले.

कृषि विभागामार्फत जागतिक मृदा दिनानिमित्त आत्मा सभागृहात मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण पालकमंत्री विजय देशमुख यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती मल्लीकार्जून पाटील, विभागीय कृषि संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजय अमृतसागर, जिल्हा मृदा सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी एस.बी. जेटगी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, ‘माती तयार होण्यासाठी सुमारे 100 वर्षाचा कालावधी लागतो. यामुळे तिचे आरोग्यही उत्तम राखणे गरजेचे आहे. अधिकचे उत्पन्न मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा होत असलेल्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडते. त्यातच मुबलक पाणी मिळत असल्याने जमीन क्षारपडीचे प्रमाण वाढत आहे. या सर्वांचा थेट परिणाम उत्पादकतेवर होत असल्याने शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळले पाहिजे. माती परीक्षणानंतर त्यामध्ये कोणती पिके घ्यावीत, पाणी किती द्यावे, कोणती रासायनिक खते व किती प्रमाणात वापरावीत याची माहिती घेऊनच पुढील काळात शेती करणे आवश्यक आहे. यासाठी शासन कृषि विभागामार्फत वेगवेगळ्या योजना राबवित आहे. कृषि विभागानेही माती परिक्षणासाठी भरीव जनजागृती आणि प्रशिक्षण व प्रत्यक्ष शेतीवर भेटीचा कार्यक्रम राबवावा.

श्री.जेटगी यांनी प्रस्ताविकात मृदा आरोग्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, रासायनिक खतापेक्षा ताग, धैंचा, हिरवळीच्या खतांना प्राधान्य द्यावे. सन 2017 -2018 मध्ये जिल्हृ्यातील 477 गावातील 98 हजार 498 माती नमुने घेण्यात येणार असून आतापर्यत 93 हजार 218 नमुने घेण्यात आले आहेत. पैकी 86 हजार 17 माती नमुने प्रयोगशाळेत तपासणीस पाठविले आहेत. यातील 53 हजार 860 नमुन्याची तपासणी झाली असून आज मृदा आरोग्य दिनी जिल्ह्यातील 47 हजार 577 शेतकऱ्याना मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी हनुमान शेतकरी गटास नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांनी जागतिक मृदा आरोग्य दिनानिमित्त प्रतिज्ञा घेतली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा