महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण बुधवार, ०१ मे, २०१९


सांगली :
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापनदिनी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर संगीता खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शशीकांत बोराटे, उपवनसंरक्षक पी. बी. धानके आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन आपल्या संदेशात पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मंगल कलश आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या, सर्व महाराष्ट्र सुपुत्रांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी या सर्वांनी घेतलेले कष्ट आणि केलेला त्याग, महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. तसेच, राज्याच्या जडणघडणीत असलेल्या अमूल्य योगदानाबद्दल सर्व कामगार बांधवांचे आभार मानतो.

पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, आतापर्यंतच्या वाटचालीत महाराष्ट्राने समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कृषि, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, संशोधन, साहित्य, नाटक, चित्रपट, कला, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. देशातीलच नव्हे तर जगातील प्रगतशील आणि पुरोगामी राज्य म्हणून आज महाराष्ट्राचा लौकिक आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा हा लौकिक निर्माण करण्यात, देश-विदेशात आणि समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मराठी सुपुत्रांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या या सर्व सुपुत्रांचे, त्यांच्या योगदानाबद्दल त्यांनी यावेळी ऋणनिर्देश व्यक्त केले.

प्रारंभी महाराष्ट्र दिनानिमित्त सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीतवादनाने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी संचलनाची पाहणी करुन मानवंदना स्वीकारली. यानंतर विविध पथकांनी दिमाखदार संचलन करुन राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. या संचलनाचे नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर यांनी केले. यावेळी झालेल्या संचलनामध्ये जिल्हा पोलीस दल पथक, गृहरक्षक दल पथक, महिला पोलीस पथक, वाहतूक नियंत्रण कक्षाचे पथक, अग्निशमन दलाचे पथक, श्रीमती राजगोंडा नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूलचे विद्यार्थिनी पथक, पोलीस बँड पथक आदि सहभागी झाले. तसेच, तात्काळ प्रतिसाद यंत्रणा पथक, निर्भया पथक, गस्त पथक, श्वान पथक, दंगल नियंत्रण पथक, जैल कैदी पथक वाहन, पत्रकार दीपक चव्हाण यांचा पाणी वाचवा अभियान दुचाकीरथ, रुग्णवाहिका आणि अग्निशमन पथक इत्यादि पथकांचा सहभाग होता.

या सोहळ्यास पद्मश्री विजयकुमार शहा, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, सर्व शासकीय विभागांचे प्रमुख, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या ध्वजारोहण समारंभासाठी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे आणि बाबासाहेब वाघमोडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांचे व पोलीस विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा