महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
डॉ.आंबेडकर शाळा प्रवेश दिन देशभर विद्यार्थी दिन म्हणून साजरा व्हावा यासाठी प्रयत्न - बडोले बुधवार, ०८ नोव्हेंबर, २०१७
प्रतापसिंह हायस्कूल विकासासाठी निधी देणार, 7 नोव्हेंबर 1900 हा अभूतपूर्व दिवस

सातारा :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इयत्ता पहिलीमध्ये ज्या (प्रतापसिंह) सातारा हायस्कूलमध्ये 7 नोव्हेंबर 1900 रोजी प्रवेश केला, तो ऐतिहासिक दिवस खूप महत्वाचा आहे. त्यांचे पहिले पाऊल या शाळेत पडले. पुढे ते शिकले त्यामुळे देशातील माझ्यासारखे दीन दलित शिकले. त्यांचे हे योगदान देश कधीही विसरणार नाही. मंगळवारी राज्यात विद्यार्थी दिन साजरा झाला. पुढच्या वर्षीपासून संपूर्ण देशात हा दिवस “विद्यार्थी दिन” म्हणून साजरा करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करु असे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.

येथील सातारा हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, तहसीलदार निलप्रसाद चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देवीदास कुलाळ, समाज कल्याण अधिकारी विजय गायकवाड, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, प्रतापसिंह हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शबनम मुजावर, ए. के. गायकवाड, अरुण जावळे आदी उपस्थित होते.

श्री. बडोले म्हणाले, आजच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये आणि त्याकाळच्या सातारा हायस्कूलमध्ये 7 नोव्हेंबर 1900 रोजी इयत्ता पहिलीच्या वर्गात छोट्या भीमरावांनी प्रवेश घेतला जो दिवस भारतीय इतिहासातील अभूतपूर्व दिवस आहे. ते शिकले म्हणून पुढे लाखो दलित शिकले. माझ्यासाराखी दलित मुलं त्यांच्या या ज्ञानामुळे आणि पुढे त्यांनी लिहिलेल्या घटनेमुळे मंत्रीही झाले. त्यामुळे हे प्रतापसिंह हायस्कूल देशाचे प्रेरणास्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या सर्व स्थळांचा विकास करण्यासाठी आमचा प्रयत्न असून या शाळेच्या विकासासाठीही मोठा निधी देवून ही शाळा पूर्ण देशातील विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थळ होईल असा प्रयत्न राहील. सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने ही शाळा 5 वी ते 10 वीपर्यंत चालविली जाते. ही शाळा गुणवत्तापूर्ण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या आम्ही देवू असेही त्यांनी सांगितले.

ज्या शाळेत डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणासाठी पहिले पाऊल टाकले, ती शाळा पाहताना आणि ज्या रजिस्टरमध्ये त्यांचे नाव आणि त्यांची स्वाक्षरी (मोडी लिपीमध्ये) पाहताना अंगावर रोमांच उभे राहिले, अशी भावना श्री.कांबळे यांनी व्यक्त केली. डॉ. आंबेडकरांनी ज्या शाळेत पहिल्यांदा पाऊल टाकले ती प्रतापसिंह हायस्कूल शाळा आणि सर्वोच्च शिक्षण ज्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये घेतले ते दोन्ही ठिकाण पाहण्याचे भाग्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमानाने जगायला शिकविले. “प्रॉब्लेम ऑफ रुपीज” सारख्या पुस्तकातून देशाला अर्थसाक्षर केले. त्यांच्या संकल्पनेतून रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाली. अशा महामानवाचे शिक्षण या शाळेत झाले. त्यामुळे ही शाळा संपूर्ण देशासाठी महत्वाची आहे. त्या शाळेच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार जिल्हा परिषदेला सर्वतोपरी मदत करेल, असेही श्री.कांबळे यांनी सांगितले.

प्रमुख पाहुण्यांना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने शाळा रजिस्टरमधील डॉ. बाबासाहेब यांच्या नावाच्या नोंदीचे पान फ्रेम असलेले स्मृती चिन्ह भेट म्हणून देण्यात आले.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेच्या या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकले असल्यामुळे ही शाळा चांगल्या प्रकारे विकसीत केली जाणार आहे. सातारा‍ जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेत गेल्यावर्षी राज्यात दुसरा तर यावर्षी पहिला क्रमांक असल्याचे सांगितले. ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य यशवंत पाटणे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण विषद केले. त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचाही मागोवा यावेळी घेतला.

डॉ. बाबासाहेबांच्या शाळा नोंदीचे रजिस्टर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाच्यावेळी ज्या रजिस्टरमध्ये नोंद घेतली आहे. ते ऐतिहासिक रजिस्टर मंत्रीद्वय श्री. बडोले, श्री. कांबळे यांनी पाहिले. त्या रजिस्टरमध्ये अनुक्रमांक 1914 वर “ भीवा रामजी आंबेडकर ” असे नाव असून जन्म तारीख 14 एप्रिल 1891 ही आहे. पुढच्या कॉलममध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मोडी लिपीत स्वाक्षरी आहे. पुढच्या कॉलममध्ये शाळा प्रवेशाचा दिनांक आहे. 7 नोव्हेंबर 1900 आणि त्यापुढे मार्च 1904 मध्ये शाळा सोडल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. हे रजिस्टर जिल्हा परिषदेच्या शाळांनी लॅमिनेट करुन ठेवले आहे. मुख्याध्यापकांच्या कार्यालयाबाहेर शाळा 1850 पासूनच्या आतापर्यंतच्या मुख्याध्यापकांची नावे आहेत. 1900 ते 1907 पर्यंत ग. व्यं. जोशी हे मुख्याध्यापक होते. हे सर्व दोन्ही मंत्र्यांनी अतिशय आस्थेने पाहून हे रेकॉर्ड अतिशय उत्तमरितीने जपून ठेवल्याबद्दल जिल्हा परिषद शाळेचे कौतुक केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा