महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेवटच्या घटकांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्याचे शासनाचे उद्दीष्ट - पालकमंत्री डॉ.पाटील शनिवार, १३ मे, २०१७
मुर्तिजापूर येथील समाधान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जनतेच्या तक्रारींचे जागेवरच निवारण
जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
शेवटच्या घटकांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्याचे शासनाचे उद्दीष्ट

अकोला :
समाजातील सर्वसामान्य घटकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना समाधानी करणे, हे समाधान शिबीराच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या तक्रारी जागच्या जागी निवारण करणे हा शासनाचा उद्देश असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज मुर्तिजापूर येथे महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित विस्तारीत समाधान शिबीरात मार्गदर्शन करताना केले.

मुर्तिजापूर येथील तिडके नगरातील राधामंगलम येथे आयोजित या शिबीरास आमदार हरिष पिपंळे, नगराध्यक्षा मोनाली गांवडे, अप्पर जिल्हाधिकारी गजानन सुरंजे, मुर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी भागवत सैदाणे, मुर्तिजापूरचे तहसीलदार राहुल तायडे, बार्शिटाकळीचे तहसीलदार रवि काळे आदींसह सर्व विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या शिबीरात विविध विभागांच्या सुमारे 172 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 132 मुर्तिजापूर तालुक्यातील व 40 तक्रारी बार्शिटाकळी तालुक्याच्या होत्या. प्रत्येक तक्रारदारांची समस्या ऐकून पालकमंत्र्यांनी जागेवरच तक्रारदारांचे समाधान केले. तक्रारदाराचे पूर्ण समाधान झाल्यानंतरच पुढील तक्रारीकडे ते वळत होते. तक्रार निवारणात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री डॉ. रणजित पाटील म्हणाले की, सर्वसामान्यांच्या हितासाठी शासन सातत्याने विविध निर्णय घेत आहे. अनेक योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे. समाधान शिबीरासारखे उपक्रम यासाठी प्रभावशाली ठरत आहेत. जनतेची कामे तातडीने होण्यासाठी सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या सुखासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. केवळ सातबाराच्या आधारे शेतकऱ्यांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच अल्पदरात गहू, तांदूळ देण्याचा उपक्रमही सुरु आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयक साहित्य मनाप्रमाणे खरेदी करता यावे, यासाठी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पालकमंत्री म्हणाले की, शेतीसोबत पुरक धंदा करणे गरजेचे असून यासाठी कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे. युवा शेतकऱ्यांनी विविध प्रकारचे कौशल्य प्राप्त करावे कौशल्याची कास धरावी यासाठी शासनाच्या किमान कौशल्य प्राप्त करण्यासाठी विविध कमी मुदतीचे अभ्यासक्रम सुरू असून याचा लाभ युवा शेतकऱ्यांनी घ्यावा व स्वत: ला कौशल्यभिमुख बनवावे.

आमदार हरिष पिपंळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्तविक उपविभागीय अधिकारी भागवत सैदाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या परिसरात विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारे अंदाजे 20 स्टॉल उभे करण्यात आले होते. या स्टॉलची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या लोकराज्य स्टॉलला त्यांनी भेट दिली. यावेळी या मे महिन्याचे लोकराज्य मासिक त्यांना भेट देण्यात आले या लोकराज्य मासिकाचे अवलोकन त्यांनी शिबीर दरम्यान प्राप्त झालेल्या फावल्या वेळात केले. यावेळी पालकमंत्री डॉ रणजीत पाटील यांच्या हस्ते सुनील वानखडे, रमाबाई मेश्राम तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत संतोष निघोट, ज्ञानेश्वर भिवरकर यांना धनादेश देण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा