महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण - पंकजा मुंडे सोमवार, ०७ जानेवारी, २०१९


बीड : राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता देण्याचा निर्णय घेतला असून याबाबत न्यायालयीन पातळीवरीही गांभिर्यपूर्वक विषय हातळला जात आहे. सर्व सामांन्याच्या विकासाचे लक्ष साध्य करण्याच्या दिशेने शासनाचे काम सुरु आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

जिल्ह्यातील वडवणी येथील कृषी उत्पन्न समितीच्या शॉपींग कॉम्प्लेक्स लोकार्पण कार्यक्रमाप्रंसगी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ.प्रितम मुंडे, आमदार आर.टी. देशमुख, आमदार सुरेश धस, रमेश आडसकर, राजाभाऊ मुंडे, मोहन जगताप, बाबुराव पोटभरे इत्यादी उपस्थित होते.

मंत्री  श्रीमती मुंडे म्हणाल्या मराठा मोर्चाच्या मागण्यांसाठी अधिवेशन काळात परळीमध्ये आंदोलनाचे केंद्र झाले होते. त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन कालमर्यादेत हा विषय सोडविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्याच्या पायावर विकासाचा अभिषेक करण्यासाठी बचत गटाच्या महिला, विद्यार्थी, युवक आणि गरीबांसाठी योजना राबविल्या. यात घरकूल योजना, अभ्यासिका, शाळा दुरुस्तीची कामे होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, जिल्ह्यातील शेतकरी अडचणी असल्याचे दिसत असून त्याची आर्थिक स्थिती ढासळली आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील काही तालुक्यात निर्माण झालेला ऊसाचा प्रश्न योग्य प्रकारे हाताळू. दुष्काळ आदी कारणामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी पाठपुरावा करु, असे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी सांगितले प्रत्येक गाव तांड्यावर विकास निधी दिला जातो आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, घरकूल योजना राबविल्या जात आहेत. आमदार देशमुख म्हणाले राज्य शासनाकडून मिळालेल्या‍ निधीमधून शहरामध्ये सुंदर विकास कामे झाली आहेत. आमदार धस म्हणाले 30 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगर-परळी रेल्वे मार्गाचे काम सुरु झाले आहे.

तालुक्यातील विविध गावांच्या सरपंचानी मंत्री महोदयांचे स्वागत केले. नवीन पूल व शहरातील अंतर्गत सिंमेंट रस्ते, भूमिगत गटारे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शॉपींग कॉम्प्लेक्सचे लोकार्पण आणि उद्घाटन यावेळी मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते झाले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा