महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
औरंगाबाद जिल्हा बँकेकडून रुपे किसान क्रेडीट कार्डचे वाटप बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७
बँकेचे विकासाच्या दिशेने पुढचे पाऊल - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे

औरंगाबाद :
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ठेवीदार, कर्जदारांना रुपे किसान क्रेडीट कार्डचे वाटप करुन या बँकेने आर्थिक विकासाच्या दिशेने पुढचे पाऊल टाकल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ठेवीदार, कर्जदारांना रुपे किसान क्रेडीट कार्डचे वाटप हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बँकेचे चेअरमन सुरेश पाटील, उपाध्यक्ष भगवान नवपूते यांच्यासह संचालक, सदस्यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

श्री.बागडे म्हणाले की, कोणतीही सहकारी संस्था, पतसंस्था, बँक व्यवस्थीत चालण्यासाठी वसूली महत्वाची असते, हे लक्षात घेऊन जिल्हा बँकेने नियमानुसार शंभर टक्के वसुलीवर भर दिला तर ठेवीदाराने गुंतविलेला पैसा सुरक्षित राहून त्याचा योग्य विनियोग होतो. त्यासोबतच बँकेची विश्वासार्हता वाढते आणि त्याचा फायदा बँकेच्या ठेवीदारांची संख्या वाढण्यावर होतो. यादृष्टीने सहकारी संस्था कायम नफ्यात ठेवण्याची जबाबदारी संचालक मंडळासोबतच त्याठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ठेवीदार, कर्जदारांचीही असते.

गरजू आर्थिक दुर्बल घटकांना अर्थसहाय्य करण्याची महत्वाची जबाबदारी सहकारी संस्था पार पाडत असतात त्यामुळे त्या जितक्या जास्त प्रमाणात आर्थिकदृष्या बळकट राहतील तितक्या अधिक प्रमाणात गरजू शेतकरी, गांवकरी याला सावकाराच्या जाचक दडपणापासून दूर ठेऊन वेळेवर आर्थिक मदत करणे शक्य होईल. शेतकरी कर्जमाफी सारखी उपयुक्त योजना शासनाने जाहीर केलेली असून पावसाळी अधिवेशनात या कर्जमाफी योजनेसाठी प्राथमिक निधीची तरतूद म्हणून 20 हजार कोटी रुपयांच्या निधीला विधिमंडळात मान्यता देण्यात आलेली आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे पीक विमा, अटल पेन्शन योजनेसारख्या विविध लोकोपयुक्त योजना शासन राबवित असून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहनही श्री.बागडे यांनी उपस्थितांना केले.

बँकेचे चेअरमन पाटील यांनी प्रास्ताविकात रुपे किसान क्रेडीट कार्ड हे देशभरातील कुठल्याही एटीएमवर वापरता येणार असून याद्वारे आपल्या खात्यात जमा असलेल्या रकमेतून एका दिवशी जास्तीत जास्त 20 हजार रुपये काढता येतील. वर्षभर कार्ड वापरासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून कार्डवर असलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर आवश्यक ते मार्गदर्शन उपलब्ध आहे, असे सांगितले. यावेळी जिल्हा बँकेच्या विविध शाखांच्या सभासद, ठेवीदार, कर्जदारांना मान्यवरांच्या हस्ते किसान क्रेडीट कार्ड वाटप करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा