महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पाणीटंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोमवार, २० मार्च, २०१७
जून पर्यंतचे प्रस्ताव सादर न करणाऱ्या ग्रामसेवकांवर जबाबदारी
विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव तात्काळ सादर करा
कामठी 83 उपाययोजना 90.7 लक्ष खर्च

नागपूर :
पिण्याच्या पाण्याच्या टंचाई संदर्भात प्रत्येक गावात राबवायच्या उपाययोजना संदर्भात ग्रामसेवकांनी जूनपर्यंत राबवायचा आराखडा तात्काळ तयार करून सादर करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पाणीटंचाई संदर्भात आराखड्यानुसार कामे होणार नाहीत, अशा ग्रामसेवकांच्या दोन वेतनवाढी थांबविण्यात येतील, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कामठी येथे दिल्या.

कामठी तालुक्यातील पाणीटंचाई संदर्भात तयार करण्यात आलेल्या आराखड्याच्या अंमलबजावणीनुसार प्रत्येक गावातील सरपंच व ग्रामसेवकांकडून आढावा घेतला. त्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निशाताई सावरकर, पंचायत समितीचे सभापती श्रीमती अनिता चिट्टे, उपसभापती देवेंद्र गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी श्री. केदार आदी उपस्थित होते.

कामठी तालुक्यातील पाणीटंचाई आराखड्यानुसार 45 गावांमध्ये 83 विविध उपयोजना सुचविण्यात आल्या असून यावर 90.07 लक्ष खर्च अपेक्षित असून हा आराखडा दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यामध्ये नळ योजनांची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिरीचे बांधकाम, खाजगी विहिरींचे अधिग्रहण, तसेच पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा आदींचा समावेश असल्याचे सांगताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भिलगाव, कसाळा, मसाळा, खैरी व कवटा या गावांना नागपूर महानगर पालिकेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहेत, तसेच कन्हान नदीवरुन रनाळा व येरखड्यासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा कार्यान्वीत करण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाअंतर्गत गुमथाळा, वडाळा, गुमगाव, आदी गावांना मुख्यमंत्री पेयजल योजनेमधून कामे घेण्यात येतील. ज्या गावांमध्ये बोअरवेल बंद आहे, तसेच ज्या बोअरवेलचे पाणी पिण्यास अयोग्य आहे अशा सर्व बोअरवेलची यादी तयार करुन त्या यादीतून वगळण्यात यावा. तसेच 50 नवीन बोअरवेलचा प्रस्ताव सादर कराव्या.

पाणीटंचाई आराखड्यानुसार भिलगाव, जाखेगाव, आसोली, सावडी, परसोडी व चिखली या सहा गावात खाजगी विंधन विहिर अधिग्रहीत करण्याचे प्रस्तावित असून मसाळा, भिलगाव, बिडगाव आणि तरोडीखुर्द या गावांमध्ये आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती देताना पालकमंत्री म्हणाले की, ग्रामसेवकांनी सरपंचांना संमतीने पाणी टंचाई आराखड्यानुसार उपाययोजना संदर्भातील प्रस्ताव तात्काळ सादर करावे, त्याला मंजुरी मिळताच कामाला सुरुवात करावी.

कामठी शहरातील पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले की, उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही यादृष्टीने नियोजन करा. प्रभाग 15 मधील दुषित पाण्याच्या संदर्भात तसेच आनंदनगर, रामगड या भागातील जलवाहिनीतून पाणी वाया जात असल्याच्या संदर्भात मुख्याधिकारी रवींद्र भेलावे यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रारंभी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी कामठी तालुक्यात पिण्याच्या पाणीटंचाई संदर्भात जून अखेरपर्यंत दोन टप्प्यात राबविण्यात येणार असल्याच्या उपाययोजनांची माहिती दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा