महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
‘जनसंवाद’ कार्यक्रमाची राज्यात पुणे जिल्ह्यातून सुरुवात - ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गुरुवार, २० एप्रिल, २०१७
  • नागरिकांना वीजेबद्दलच्या समस्या थेट ऊर्जामंत्र्यांकडे दाखल करता येणार

पुणे : अनियमित वीज पुरवठा, वीज खंडीत होणे तसेच वीज जोडणी, वीजेचे देयक वेळेवर न मिळणे, चुकीचे देयक मिळणे याबद्दल नागरिकांच्या महावितरणच्या कामासंबधीच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही होण्यासाठी ‘जनसंवाद’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राज्यात या कार्यक्रमाची सुरुवात पुणे येथून करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांच्या महावितरणबद्दलच्या तक्रारी त्वरीत सोडविण्यात येतील, अशी माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिली.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण, महापारेषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या कामाची आढावा बैठक विधान भवन सभागृहात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार राहूल कुल, आमदार शरद सोनवणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, विविध नगरपालिकेचे नगराध्यक्ष, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांना त्यांच्या वीजेच्या समस्यांचे तात्काळ निराकरण होण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट ऊर्जा मंत्र्यांशी संपर्क साधता येऊन तक्रार दाखल करता येणार आहे. ऊर्जा मंत्र्यांकडे थेट तक्रार केल्यामुळे तक्रारीचे त्वरित निराकरण होईल अशी अपेक्षा ऊर्जा मंत्र्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना त्यांच्या थकीत वीज बीलाचा भरणा पाच हत्यामध्ये करण्याची सवलत उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज बीलाच्या वसूलीवर भर देऊन शंभर टक्के वसूली करावी असे निर्देश यावेळी ऊर्जा मंत्र्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी महावितरण व महापारेषणच्या कामकाजाचा आढावा ऊर्जा मंत्र्यांनी घेतला.

आढावा बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींनी त्यांच्या परिसरातील महावितरणसंदर्भातील समस्या मांडल्या. ऊर्जा मंत्र्यांनी या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला विविध नगर परिषदांचे पदाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा