महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित क्षेत्रांची पालकमंत्र्यांकडून पाहणी गुरुवार, १२ जुलै, २०१८
बाधितांची प्रशासनाने घेतली तात्काळ दखल
सर्व प्राथमिक सोयी पुरविण्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी दिले निर्देश

पालघर :
पालघर जिल्ह्यात मागील 2-3 दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्याने वसई, विरार, नालासोपारा, पालघर, सातपाटी आदी भागातील नागरीक बाधित झाले असून त्यांना प्रशासनामार्फत सर्व त्या प्राथमिक सोयी सुविधा पुरविल्या जात आहेत. पावसाचे पाणी ओसरल्यानंतर बाधित क्षेत्रांचे पंचनामे करण्यात येऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांना या भागाची पाहणी करून बाधितांना दिलासा देण्याची सूचना केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी आज बाधित क्षेत्रांची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. सखल भागात वाहन जाणे शक्य नसल्याने पालकमंत्र्यांनी अग्निशमन दलाच्या गाडीतून प्रवास करून ही पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थित होते.

श्री.सवरा म्हणाले, अतिवृष्टी आणि समुद्राला असलेली भरती एकत्र आल्याने पाण्याचा निचरा झाला नाही. यामुळे प्रभावित झालेल्या सखल भागातील बाधित नागरिकांना तातडीची उपाययोजना म्हणून प्रशासनाने तात्काळ प्राथमिक सोयी संविधा पुरविल्या आहेत. त्यांच्या भोजनाची तसेच राहण्याची सोय करण्यात आली असून त्यांना वैद्यकीय सेवाही पुरविण्यात आल्या आहेत. नागरीकांना तातडीने मदत पुरविणे आवश्यक असल्याने शासन, प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्था एकत्र मिळून कार्य करीत आहेत. हवामानाचा पुढील अंदाज लक्षात घेता सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पाणी ओसरल्यानंतर बाधित क्षेत्रांचे पंचनामे करण्यात येतील, असेही श्री.सवरा यांनी सांगितले. आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत याकरिता वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये पोलीस, महानगरपालिका, रेल्वे, अग्निशमन, एसटी महामंडळ, स्वयंसेवी संस्था आदी यंत्रणांनी टीम म्हणून काम केले असल्याचे सांगितले. एनडीआरएफची टीम देखील तातडीने पोहोचल्याने नागरिकांची सुटका करण्यात मोठी मदत झाल्याचे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्र्यांसमवेत आमदार सर्वश्री हितेंद्र ठाकूर, पास्कल धनारे, पोलीस अधीक्षक मंजुनाथ शिंगे, वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे आदी उपस्थित होते.नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्या शिंगडा यांच्या वारसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश प्रदान

डहाणू तालुक्यातील बारक्या पांडू शिंगडा (वय 56) यांचा नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसांना शासनाच्या वतीने पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते चार लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश प्रदान केला.

शिलोंडा (सडकीपाडा) येथील रहिवासी असलेले बारक्या शिंगडा हे 6 जुलै रोजी शिरीषपाडा येथे सासरवाडीला जात असताना नदीच्या पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाय घसरून पुराच्या पाण्यात पडले. यात बारक्या शिंगडा यांचा मृत्यू झाला. पालकमंत्री विष्णू सवरा यांनी आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तसेच त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांचे सांत्वन केले. ‍शिंगडा यांची पत्नी श्रीमती जेठा बारक्या शिंगडा (वय 51) यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते चार लाख रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, पालघरचे उपविभागीय अधिकारी विकास गजरे, डहाणूचे तहसिलदार राहूल सारंग आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा