महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सामाजिक सौहार्द राखण्यासाठी प्रशासनांनी जनतेमध्ये जाणे आवश्यक : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सोमवार, ०३ जून, २०१९


ईदीच्या जिल्हावासियांना शुभेच्छा ; इफ्तार पार्टीमध्ये सहभाग

चंद्रपूर  :
सामाजिक सौहार्द हे परस्परांच्या समन्वयातून व सहभागातून बहरत असते. पोलीस विभागाने यासाठी इफ्तार पार्टी सारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून सामाजिक एकोपा वाढविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. अशा सण, उत्सवांमध्ये प्रशासनाचा सहभाग जनतेचा शासनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन वाढविते, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

बल्लारपूर पोलीस ठाण्यात काल इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाल्यानंतर मान्यवरांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील समस्त मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारपूर शहराने नेहमीच सामाजिक सौहार्दाचे उत्तम वातावरण कायम राखले आहे. या तालुक्याच्या शहराला प्राचीन इतिहास असून या शहराने नेहमीच वेगवेगळ्या धर्म, पंथ समुदायाला स्वीकारल्याचे इतिहास सांगते. आजही या परिसरात मिनी इंडिया म्हणून या शहराची ओळख दिली जाते. या शहरांमध्ये सर्व धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळे अशा शहरात सर्व समाजाच्या धार्मिक उत्सवांमध्ये पोलीस विभागाचा सहभाग उल्लेखनीय ठरते. किंबहुना प्रशासनामध्ये सामान्य माणसाच्या सुखदुःखात उत्सव पर्वात सहभागी झाल्याने प्रशासना बाबतचा सकारात्मक दृष्टिकोन समाजामध्ये तयार होतो.

यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, ठाणेदार दीपक गोतमारे यांनी या योजनांसाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. त्यावेळी सहभागी झालेल्या मुस्लिम समाजाच्या नेत्यांशी धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची तथा इफ्तार साठी आलेल्या सामान्य जनतेशी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्यक्ष संपर्क साधला.

या कार्यक्रमाला अतिशय व्यस्त कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शविली. याबद्दल ठाणेदार दीपक गोतमारे यांनी त्यांचे आभार मानले.

इफ्तार पार्टीच्या या योजनांमध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, उपविभागीय पोलिस अधिकारी खैरे, कोल्हापूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा मौलाना इमानुद्दिन, मौलाना शफीउल्ला कादरी, मौलाना मुख्तारजी यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा