महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राष्ट्र सामर्थ्यशाली होण्यासाठी गावांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे - पालकमंत्री रविवार, १६ जुलै, २०१७
  • मराठवाडा व विदर्भातील दुग्धविकासासाठी 650 कोटी
  • ‘आरे’ हा दुधाचा शासकीय ब्रॅंड
  • कव्हा येथे विविध विकास विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण

लातूर  :
जागतिक मंदीच्या काळात अनेक देशाच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या आहेत. परंतु ज्या देशातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास झालेला आहे त्या देशांच्या अर्थव्यवस्था मजबूत आहेत. त्यामुळे राष्ट्र सामर्थ्यशाली होण्यासाठी गावांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, असे प्रतिपादन कामगार कल्याण, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण व भूकंप पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

स्मार्ट व्हिलेज कव्हा येथील स्वामी दयानंद विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, शैलेश पाटील चाकूरकर, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, श्रीमती प्रतिभा पाटील कव्हेकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. निलंगेकर म्हणाले की, ग्रामीण भागात विविध विकासात्मक योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास त्या भागाची अर्थव्यवस्था बळकट होऊन देश सामर्थ्यशाली होईल. तसेच प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळाले पाहिजे व संपूर्ण गाव एका विचाराने प्रभावित होऊन एकत्रित आला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिलेला असून राज्य शासनही ‘जलयुक्त शिवार अभियान’, ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ आदी योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे श्री. निलंगेकर यांनी सांगितले. तसेच राज्य शासन लवकरच महिलांसाठी ‘अन्नपूर्णा योजना’ राबविणार असून याअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षण देऊन सन 2019 पूर्वी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कव्हा येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या कामातील अडचणी दूर करुन पुढील महिन्यात काम सुरु करण्यात येईल. त्याप्रमाणेच येथे कौशल्य विकासाचे सेंटर देण्यात येईल असे श्री. निलंगेकर यांनी सांगितले.

स्मार्ट व्हिलेज कव्हाच्या माध्यमातून महात्मा गांधीजींचे खेड्यांच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे मत पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री. जानकर यांनी व्यक्त केले. देवणी या गोवंशीय जातीची इतर देशात मोठी मागणी आहे. तसेच ही जात उत्तम प्रकारची असल्याने देवणी येथे याबाबत संशोधन व विकास केंद्र उभारण्यासाठी 34 कोटींचा निधी मंजूर केला असून त्याकरिता शंभर एकर जागेची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या भागात दुग्ध उत्पादनात वाढ करण्याबरोबरच कृषिला पूरक व्यवसाय निर्माण करुन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात शासकीय दुग्ध प्रकल्पांचे पुर्नजीवन करण्यात येत असून त्याकरिता ‘आरे’ नावाने दुधाच्या शासकीय ब्रॅंड तयार करण्याचे नियोजन आहे. त्याप्रमाणेच राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्डाकडून मराठवाडा व विदर्भातील दुग्ध उत्पादन वाढीसाठी 650 कोटींचा निधी मिळाला असल्याचे श्री. जानकर यांनी सांगितले.

दुग्धविकास, पशुसंवर्धन व मत्स्यविकास विभागामार्फत ‘मागेल त्याला पोल्ट्री’, ‘मागेल त्याला मासुळी’ या योजना राबविल्या जात असून शेतक-यांना शेतीला पुरक व्यवसाय देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे श्री. जानकर यांनी सांगुन कव्हा येथील श्रेणी-2 च्या पशुवैद्यकीय दवाखान्यास श्रेणी-1 मध्ये आजपासून रुपांतरित करत असल्याचे सांगितले. तसेच राज्यात ‘मिल्क पार्लर’ ही योजना राबविण्यास सुरुवात झाल्यास पहिले मिल्क पार्लर कव्हा गावाला देण्यात येईल, असे श्री. जानकर यांनी स्पष्ट केले.

देशाच्या विकासात ग्रामीण भागाच्या विकासाचे महत्व अनन्य साधारण असून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय देश स्वयंपूर्ण होणार नसल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले. तसेच शेतीचा विकास करुन शेतक-यांना न्याय द्यायचा असेल तर शेतीमालाला योग्य भाव मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढील काळात लोकांनीही शासनाकडून सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील ही अपेक्षा न ठेवता परस्परांना मदत करुन आपल्या अडचणीबाबत मार्ग काढला पाहिजे, असे श्री. चाकूरकर यांनी म्हटले.

माजी आमदार श्री. कव्हेकर यांनी प्रास्ताविकात स्मार्ट व्हिलेज संकल्पनेची माहिती देऊन कव्हा गावांसाठी विविध विकासात्मक योजनांची मागणी केली. यावेळी श्रीमती प्रतिभा पाटील कव्हेकर,माजी खासदार गोपाळ पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. सुधीर बनशेळकीकर व विनिया बनशेळकीकर यांनी स्वागत गीत सादर केले.

विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण :-

स्मार्ट व्हिलेज कव्हा गावांमधील लातूर कव्हा रस्त्यावरील पुलाचे उद्घाटन, जलयुक्त शिवार अंतर्गतच्या बंधा-यातील पाण्याचे जलपूजन, पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे उद्घाटन, कव्हा गावातील प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन, कव्हा ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठा करणा-या आरओ योजनेचे लोकार्पण आदि कामांचे उद्घाटन व लोकार्पण माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर , पालकमंत्री श्री. निलंगेकर व पशुसंवर्धन मंत्री श्री. जानकर यांच्या हस्ते पार पडले.

पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ प्रमाणपत्र :-
जिल्ह्यातील 18 पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ प्रमाणपत्र मिळालेले असून या प्रमाणपत्रांचे वितरण कव्हा येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्मार्ट व्हिलेज कव्हा गाव या विशेषांकाचे प्रकाशन ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रमाणेच कव्हा गाव निर्मल ग्राम झाल्याने सरपंच श्रीमती ललीताबाई पाटील यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा