महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकराज्य मासिक हे स्पर्धा परिक्षांसाठी अत्यंत उपयुक्त - सहायक संचालक दत्तात्रय ठाकरे गुरुवार, ११ ऑक्टोंबर, २०१८
आयटीआय (मुलींची) अकोला येथे लोकराज्य वाचक मेळावा

अकोला :
महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिक तळागळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित लोकराज्य वाचक मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) अकोला येथे घेण्यात आला. या मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रमोद भंडारे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केद्रांचे सहायक संचालक दत्तात्रय ठाकरे, अण्णासाहेब पाटील आर्थ‍िक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नीलेश वाकोडे, प्रोजेक्ट कन्सलटन्सीचे अशोक जिराफे यांची उपस्थिती होती.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केद्रांचे सहायक संचालक दत्तात्रय ठाकरे यांच्या हस्ते लोकराज्य मासिकाचे लोकार्पण करण्यात आले. लोकराज्य मासिक हे स्पर्धा परिक्षांसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या मासिकाच्या नियमित वाचनामुळे यशाचा मार्ग निश्चितपणे सुकर होतो, असे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक माहिती अधिकारी नितीनकुमार डोंगरे यांनी लोकराज्य मासिकाबद्दल माहिती दिली. लोकराज्यसारख्या मासिकातून करियर करताना कोणत्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी कोणत्या सरकारी योजना आहेत. याची सर्व माहिती मिळू शकते. तसेच लोकराज्य मासिकाचे विविध विशेषांक हे वाचनीय व माहितीपूर्ण आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार होऊन नियमितपणे त्याचे वाचन करावे. वर्गणीदार होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा