महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
केंद्रीय पथकाने घेतला बोंडअळी नुकसानीचा आढावा गुरुवार, १७ मे, २०१८
बुलडाणा : मागील खरीप हंगामात बोंडअळीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने बोंडअळीसाठी मदत जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये एनडीआरएफ कडून सुध्दा मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या मागणीनुसार आज 17 मे 2018 रोजी केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करून बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. पथकाने सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगांव माळ व दे.राजा तालुक्यातील भिवगांव येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर उपस्थित होते.

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकतीच जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात 35 कोटी 82 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने एनडीआरएफ मधून मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मागणी केली होती. ती मागणी मान्य करत केंद्र शासनाने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवले आहे. पथक तेथील शेतकऱ्यांशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेतील.

दरम्यान आज डोंगराळ भागात वसलेल्या सावरगांव माळ ता. सिं.राजा येथे पथकातील सदस्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी पथकाला शेततळ्यासाठी 100 टक्के अनुदान देण्याची मागणी केली. शेततळे हा शाश्वत सिंचनाचा सर्वात विश्वसनीय पर्याय आहे. त्यामुळे शेततळ्याला संपूर्ण अनुदान देण्यात यावे. वन्यप्राणी या भागामध्ये पिकांचे नुकसान करतात. त्यामध्ये रोही प्राणी महत्त्वाचा आहे. या प्राण्याच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सोसावे लागते. त्यामुळे या प्राण्याचा बंदोबस्त करण्यात यावा. सौर ऊर्जेवर आधारित कृषि पंप योजनेद्वारे पुन्हा पंप वितरण सुरू करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली. पथकातील सदस्यांनी विविध कृषिच्या योजना शेतकऱ्यांना सांगितल्या.

या पथकात पथकप्रमुख अश्निकुमार नवी दिल्ली, निती आयोगाच्या डॉ. बी गणेशराम, केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या डॉ. नंदीनी गोकटे नारखेडकर, दिनानाथ, फरीदाबाद येथील आर. डी देशकर, नागपूरचे डॉ.आर.पी सिंग, सीसीआयचे उपमहाव्यवस्थापक एच.डी टेंभुर्णे, कृषि आयुक्त सचिंद्रप्रताप सिंग, उपविभागीय अधिकारी डॉ. विवेक काळे, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, तहसीलदार संतोष कणसे, तालुका कृषि अधिकारी बिपीन राठोड, गटविकास अधिकारी श्री. भटकर, सरपंच श्रीमती सविता साळवे आदींसह कृषि विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा