महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जागतिक व्यापार मेळ्यात `स्टार्टअप आणि स्टँडअप महाराष्ट्र` सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७
प्रगती मैदानात १४ ते २७ नोव्हेंबर कालावधीत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा
नवी दिल्ली :
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. `स्टार्टअप इंडिया` या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात महाराष्ट्राने यंदा `स्टार्टअप आणि स्टँडअप महाराष्ट्र` साकारला आहे. या मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते आणि राज्याचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवार  १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वा. होणार आहे.

प्रगती मैदान येथे १४ ते २७ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यात महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्यावतीने “स्टार्टअप आणि स्टँडअप महाराष्ट्र” हे राज्यात उद्योग क्षेत्राच्या प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले आहे.

संकल्पना मांडताना राज्यात ‘स्टार्टअप आणि स्टँडअप’ योजनेच्या माध्यमातून नव्याने उद्योग उभारणी करणाऱ्या राज्यातील प्रतिभावान तरूण उद्योजकांचे प्रकल्प दर्शविण्यात आले आहेत. प्रदर्शनात या योजनेच्या माध्यमातून उद्योग उभारणाऱ्या राज्यातील ६० उद्योजकांचे स्टॉल्स आहेत. तरूण उद्योजक अमोल यादव यांनी तयार केलेले भारतीय बनावटीचे विमान, इनोव्हेटीव्ह पार्किंग सोल्युशन, १५ मिनीटांमध्ये ‘वेब पोर्टल’ तयार करून देणारे स्टार्टअप, मुंबई आयआयटीच्या विद्यार्थीनीने तयार केलेले कमी किंमतीत उपलब्ध होणारे महिलांचे सॅनेटरी नॅपकीन व नॅपकीन तयार करणारी कमी किंमतीतील मशीन आदी महत्त्वपूर्ण स्टार्टअप्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत.

अमोल यादव या तरूण उद्योजकाने निर्माण केलेल्या विमानाची प्रतिकृती दालनाच्या मुख्यद्वाराचे खास आकर्षण आहे. मुंबई-अहमदाबाद ही देशातील पहिली बुलेट ट्रेन, मुंबई नागपूर समृद्धीमार्ग आणि त्याचे फायदे ही याठिकाणी दर्शविण्यात आले आहेत. याशिवाय राज्यातील लघु उद्योजकांनी तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या वस्तू, महिला उद्योजिकांद्वारे निर्मित वस्तू, महाराष्ट्राची प्रसिद्ध पैठणीही याठिकाणी प्रदर्शन व विक्रीस ठेवण्यात आले आहेत.

स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी आणि लहान उद्योजकांना मिळालेली संधी, लघुउद्योगास चालना देणारे राज्याचे धोरण, विदेशी गुंतवणूक, पर्यटन आदी विषयांना स्पर्श करणारे आकर्षक महाराष्ट्र दालन यंदा राज्याच्यावतीने उभारण्यात आले आहे.

महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते आणि राज्याचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या उपस्थितीत १४ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. या प्रसंगी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजी दौंड आणि उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा