महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सोलर प्रकल्पामुळे भारत आणि चीनचे संबंध दृढ होतील - चांग झीयुन सोमवार, ११ जून, २०१८
वर्धा :- महात्मा गांधी यांचे ग्रामसमृद्धीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पावन भुमीत सोलर सिंचन प्रकल्प सुरु करण्यात आला असल्याची माहिती चीन सरकारचे मुंबई दुतावास कार्यालयातील अधिकारी (कॉन्सूलर जनरल) चांग झीयुन यांनी दिली. ते पिंपळगाव (भोसले) येथील प्रकल्पाची हस्तांतरण आणि पाहणी करताना बोलत होते.

चीनच्या सौर ऊर्जा प्रौद्योगिकी नवाचार आणि सहयोगाने गरिबी उन्मूलनच्या पायलट कार्यक्रमांतर्गत मुंबई आधारित चीन वाणिज्यिक दूतावास युन्नान अक्षय ऊर्जा कंपनीने पिंपळगाव (भोसले) व नटाळा येथे प्रायोगिक तत्वावर सोलर सिंचन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या हस्तांतरण कार्यक्रमास मुंबई दूतावासातील अधिकारी (वाणिज्यिक कॉन्सूलर) वाँग शिलकाई, प्रकल्पाचे मार्गदर्शक कोकण विभागाचे माजी आयुक्त नानाजी सत्रे, श्री. वांग ली, श्रीमती अश्विनी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आर्वीच्या सभापती शीला पवार, सरपंच जीवन राऊत उपस्थित होते.

श्री. चाँग म्हणाले, चीन नेहमीच भारतासोबत मैत्रीचे संबंध ठेवण्यासाठी प्रयत्नरत असतो. आजचा दिवस चांगला आहे. कारण आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन दौऱ्यावर असून त्यांची चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा सुरू आहे. आणि इथे चीन सरकारच्या वतीने सोलर सिंचन प्रकल्पाचे हस्तांतरण करण्यात येत आहे. चीन येथे सौर ऊर्जेवर तांत्रिक पद्धतीची शेती करण्यात येते. त्याप्रमाणे येथील शेतकऱ्यांनी सुध्दा तांत्रिक पद्धतीची शेती करावी. तसेच शेतीमध्ये बारमाही पिके घ्यावी. याकरिता हा सोलर सिंचन प्रकल्पाची मदत होणार आहे.

चीनच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेला हा प्रकल्प राज्यातील पहिला सोलर सिंचन प्रकल्प असून यामुळे पिंपळगाव व नटाळा येथील जवळपास 50 शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाचा लाभ होणार आहे. यामुळे या परिसरातील 22 हेक्टर शेती सोलर सिंचनाखाली येईल. तसेच यापरिसरात 30 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली असल्याचे शैलेश नवाल यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाला प्रकल्पाचे समन्वयक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी माजी अधिकारी श्री. शिंदे, उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, जलसंपदा विभाभागाचे उपअभियंता श्री.साबळे, जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाचे उपअभियंता श्री. लांडगे, श्री. ससाने, पोलीस पाटील सतीश इंगोले व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा