महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
रोहयो कामाची अतिरिक्त सचिव सारंगी यांनी केली पाहणी गुरुवार, १७ मे, २०१८
गोंदिया : रोजगार हमी योजना विभागाच्या केंद्र सरकारच्या अतिरिक्त सचिव अपराजिता सारंगी यांनी 16 व 17 मे रोजी जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांना भेटी देऊन कामाची पाहणी केली. त्यांनी योजनेच्या कामावर उपस्थित मजुरांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, रोहयो आयुक्त ए.एस.आर.नायक, रोहयोचे उपायुक्त केएनके राव, श्री.फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भांडारकर यांची उपस्थिती होती.

तिरोडा तालुक्यातील नवेगाव येथील सुरू असलेल्या पांदण रस्त्याच्या कामाची पाहणी केली. बिहिरीया येथे सुरू असलेल्या पांदण रस्त्याच्या कामाची पाहणी करून कामावर उपस्थित मजुरांशी संवाद साधला. या कामावर तुम्हाला किती मजुरी मिळते, किती तास काम करता, विश्रांतीची वेळ कोणती, 90 दिवस तुम्ही रोहयोच्या कामावर काम करीत असाल तर किती योजनांचा तुम्हाला लाभ मिळतो. रोहयोतून किती जणांच्या घरी गुरांचे व बकऱ्यांचे गोठे बांधण्यात आले आहेत, हा कार्यक्रम कसा सुरू आहे असे अनेक प्रश्न श्रीमती सारंगी यांनी उपस्थित मजुरांना विचारले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आमच्या उपजीविकेचा प्रश्न सुटला असून ही योजना आमच्यासाठी आधार असल्याचे कामावरील मजुरांनी श्रीमती सारंगी यांना सांगितले. यावेळी त्यांनी या योजनेतून सुरतीलाल रहांगडाले या लाभार्थ्यांच्या घरी बांधण्यात आलेल्या गुरांच्या गोठ्याची पाहणी केली. तसेच ग्रामपंचायतला भेट देऊन रोहयोच्या कामाची कागदपत्रे बघितली. यावेळी सरपंच मदन बघेले उपस्थित होते.

मुरदोली येथे वनविभागाने रोजगार हमी योजनेतून तयार केलेल्या रोपवाटिकेला श्रीमती सारंगी यांनी भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. या रोपवाटिकेसह जिल्ह्यातील अनेक रोपवाटिकेत स्वदेशी झाडांची रोपटे तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री.काळे यांनी दिली तसेच त्यांनी स्वदेशी जातीचे झाडे लावण्यामागची भूमिका विशद केली. त्यामुळे देशातील विविध राज्यातील रोपवाटिकेत मोठ्या प्रमाणात स्वदेशी झाडांची रोपटी तयार करणार असल्याचे श्रीमती सारंगी यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा