महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
समाजाच्या हितासाठी सकारात्मक पत्रकारिता करावी - पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर सोमवार, ०६ जानेवारी, २०२०

नांदेड : समाजाच्या हितासाठी सकारात्मक पत्रकारिता व्हावी ज्यातून समाज घडविला जाईल, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय नांदेड व एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्यावतीने दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.गोविंद हंबर्डे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार देवदत्त तुंगार, माधव अटकोरे, दै. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी, प्रजावाणीचे रवींद्र कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी मिरा ढास, प्राचार्य डॉ.गणेश जोशी, पत्रकार पंढरीनाथ बोकारे, बजरंग शुक्कला, गोपाळ देशापांडे, भारत दाढेल, महेंद्र देशमुख, सुरेश काशिदे, सुर्यकुमार यन्नावार, प्रविण खंदारे, संतोष जोशी, प्रशांत गवळे, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे यांच्यासह विविध मुद्रित, ईलेक्ट्रॉनिक, छायाचित्रकार माध्यम प्रतिनिधी व पत्रकारिता विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.

दर्पण दिनानिमित्त पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर म्हणाले की, पत्रकारितेने समाज आणि देश घडविला आहे. संघर्ष हा जीवनाचा पाया आहे. पोलीस आणि पत्रकार यांचे नाते अतूट आहे. पत्रकारांनी आपली लेखणी सकारात्मक विकासात्मक व सामाजिक न्यायासाठी वापरावी. समाजातील शोषित, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी लिखाण करावे. नकारात्मक बाबी ह्या विकासाला अडसर ठरत असतात. त्यामुळे नकारात्मकता बाजूला ठेवून लिखाण करणे आवश्यक आहे. त्यांनाही अनेक घडामोडींची माहिती ठेवावी लागते, असे सांगून श्री.मगर म्हणाले पाक्षिक, साप्ताहिक, वृत्तपत्र, इलेट्रॉनिक्स पत्रकारिता आणि आता सोशल मीडिया असा प्रवास सुरु आहे. हे सर्वजण समाज घडविण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु खरी बातमी प्रकाशित करणे ही जबाबदारी लक्षात ठेऊन पत्रकारिता व्हावी अशी अपेक्षाही पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी व्यक्त केली.

दै. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांनी दर्पण दिन व भित्तीपत्रकाचे महत्व सांगून पत्रकारांनी सत्यता, विश्वासार्हता, वस्तुस्थिती, मानवहित समजून लिखाण केले पाहिजे.

जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मीरा ढास म्हणाल्या की, आरोग्य चांगले राहिले तर लिखाणातले कौशल्य आपण टिकून ठेऊ शकतो. माध्यमाला अनेक ठिकाणाहून माहितीचा स्त्रोत मिळत असतो. बातमीची सत्यता पडताळणी करुन लिखाण केले पाहिजे.

अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप करताना डॉ.गोविंद हंबर्डे यांनी माध्यम हे समाजाचे आधारस्तंभ आहे. माध्यम प्रतिनिधींनी आरोग्याकडे लक्ष देऊन या क्षेत्रात चांगले करिअर करावे, असे आवाहन त्यांनी केले.  

प्रास्ताविकात पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश जोशी यांनी पत्रकारितेतील आव्हाने स्वीकारुन सकारात्मकतेच्या दिशेने पुढे गेले पाहिजे. तसेच वृत्तपत्र, पत्रकारिता महाविद्यालयाच्या वाटचालीची त्यांनी माहिती दिली.

सुरुवातीला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. सूत्रसंचालन ऋषीकेश कोंडेकर यांनी केले तर आभार प्राध्यापक सतीश वाघरे यांनी मानले. 

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जिल्हा माहिती कार्यालया अभिवादन

नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त दर्पकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी मीरा ढास यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयात आयोजि कार्यक्रमास छायाचित्रकार विजय होकर्णे, विवेक डावरे, काशिनाथ आरेवार, शामराव सुर्यवंशी, अंगली बालनरस्या, श्रीकांत देशमुख यांनीही दर्पकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.  

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा