महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कोल्हापूरात ट्रांझिट कँम्प सुरु करणार - पालकमंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवार, १९ मे, २०१७
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रिकामे असणाऱ्या शासकीय निवासस्थानांचा सर्वे करुन त्याचे रुपांतर ट्रांझिट कँम्प मध्ये करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोल्हापूर मुख्यालय येथे असणाऱ्या पोलीस निवासस्थानांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम अत्यंत वेगाने राबवून, या माध्यमातून अतिशय दयनीय झालेल्या पोलीस निवासस्थानांचे नुतनीकरण करुन त्यांना आकर्षक स्वरुप देण्यात आले आहे. याबद्दल पोलीस बॉईज असोसिएशनच्यावतीने पोलीस मुख्यालय, ड्रिलसेड, कसबा बावडा कोल्हापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री.पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार अमल महाडिक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, सहायक पोलीस अधीक्षक हर्ष पोतद्दार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील, पोलीस उपअधीक्षक सतीश माने, भरतकुमार राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोल्हापूरातील पोलीस मुख्यालय येथे 1890 ते 1920 या कालावधीतील एकूण 25 जुन्या पोलीस लाईन्स आहेत. यामध्ये 518 पोलीस निवासस्थाने आहेत. तर 1986 मध्ये आरसीसी स्लॅबच्या 34 पोलीस लाईन बांधण्यात आल्या होत्या, त्यामध्ये 200 पोलीस निवासस्थाने आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सर्व निवासस्थानांना भेट देऊन त्यांची झालेली दयनीय स्थिती पाहून, नुतनीकरण करता येऊ शकणाऱ्या एकूण 600 निवासस्थानांबाबत दुरुस्ती, पाणी व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था, रंगकाम, विद्युतीकरण, काँक्रीटीकरण अशा अनेक कामांचे तात्काळ आदेश दिले होते. त्यानुसार 600 पोलीस निवासस्थानांमध्ये आवश्यक ती सर्व कामे करुन 6 महिन्यात त्यांचे नुतनीकरण करण्यात आले आहे. याबद्दल पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुतनीकरण करण्यात आलेल्या घरांचे फिडबॅक फॉर्म भरुन घ्यावेत, असे निर्देश देऊन पोलीस कुटुंबियांनी कोणताही संकोच न ठेवता काही त्रुटी असल्यास त्या नजरेस आणून द्याव्यात, असे सांगितले. काही वेळा अनेक वर्ष जुन्या असणाऱ्या निवासस्थानांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर तेथे राहत असणाऱ्या कुटुंबियांनी कोठे राहावयाचे असा प्रश्न निर्माण होतो. यावर मार्ग काढण्यासाठी ज्या ठिकाणी शासकीय निवासस्थाने रिकामी आहेत अशांचा सर्वे करुन त्याचे रुपांतर ट्रांझिट कँम्पमध्ये करण्यात येईल, तसेच पोलिसांच्या पाल्यांना कमी किंमतीत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सीबीएससी पॅटर्न स्कुल उभे करण्याच्यादृष्टीने घोडावत इन्स्टीट्युटची मदत घेण्यात येईल असे सांगून, युपीएससी, एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या पोलिसांच्या मुलांसाठी या ठिकाणी सुसज्ज ग्रंथालय सुरु करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर आपल्या विद्या प्रबोधनी संस्थेमध्ये पोलिसांच्या पाल्यांना निशुल्क प्रवेश देण्यात येणार असून महिला पोलिसांसाठी फिरते चेजिंग रुम लवकरच सुरु केले जाईल, असे यावेळी बोलताना पालकमंत्री यांनी सांगितले.

विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पालकमंत्री यांनी 6 महिन्याच्या अत्यंत अल्प कालावधीमध्ये 10 कोटींची कामे युद्धपातळीवर पूर्ण करुन पोलीस निवासस्थानांचे नुतनीकरण केल्याबद्दल पालकमंत्री श्री.पाटील यांचे आभार मानले. तसेच पोलीस कल्याण‍ निधीच्या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांनी पाठिंबा दिल्याने त्यातून जमा झालेल्या निधीतून पोलिसांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देणे शक्य झाल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी पोलिसांच्या पाल्यांसाठी सीबीएससी पॅटर्नची शाळा उभारण्याबाबत पालकमंत्र्यांना विनंती केली.

पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी पोलिसांना पायाभुत सुविधा मिळाल्यास पोलीस 24 तास काम करतील, असे सांगून दसरा चौकातील पोलीस निवासस्थाने अन्यत्र हलविण्याबाबत प्रयत्न व्हावेत, अशी विनंती केली.

यावेळी पोलीस पत्नी सौ.सुभदा माने यांनी पोलीस निवासस्थानांचे नुतनीकरण केल्याने पोलीस लाईनमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमात पोलिसांच्या गुणवंत पाल्यांना पालकमंत्र्यांच्याहस्ते शिष्यवृत्ती वाटप केले व नवीन पोलीस भरती झाल्याबद्दल मयुर कांबळे यांचे अभिनंदन करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा