महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्ह्यात लवकरच Cow Club (गाय क्लब) संकल्पना राबविणार - पालकमंत्री अर्जुन खोतकर शनिवार, १४ एप्रिल, २०१८
उस्मानाबाद : पालकमंत्री अर्जुन खोतकर हे नुकतेच जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी येथील अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध कामांचा आढावा घेतला. या बैठकीत पालकमंत्री यांनी जिल्ह्यात लवकरच COW CLUB संकल्पना राबविणार, असे प्रतिपादन केले.

हा जिल्हा दुष्काळामुळे पिडीत झालेला आहे. मात्र आता जलयुक्त शिवारच्या यशस्वी कामांमुळे आता पाण्याचे दुर्भिक्ष्य नाही. बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना बळ मिळाले. त्याला अधिक सक्षम बनविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न मी पालकमंत्री या नात्याने करणार आहे. येथील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय उपलब्ध करुन देणार आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षणही देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यासाठी कौशल्य विकास, नाविण्यपूर्ण योजना, जिल्हा वार्षिक योजना या माध्यमातून आवश्यक तो निधी उभा केला जाईल. याचेच पुढील पाऊल म्हणजे या जिल्ह्यात (COW CLUB) ही संकल्पना या जिल्ह्यात राबविली जाईल, असे श्री.खोतकर यांनी सागितले. या संकल्पनेबाबत बोलताना ते म्हणाले, साधारणत: 5 ते 7 एकर जागेत हे क्लब स्थापन होतील. त्यात साधारणत: 150 गीर गाईची खरेदी करण्यात येईल या गाईचे पालन पोषण कसे करावयाचे, या गाईपासून मिळणाऱ्या उत्पादनासक्षम बाबी कोणत्या, त्याची निर्मिती कशी करायची, त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण शेतकऱ्यांना देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे आहे.

श्री.खोतकर यांनी सांगितले की, यातून शॅम्पू, फिनेल, साबण,तूप, दूध, सॅनिटायझर अशा प्रकारच्या जवळपास 40 वस्तूची उत्पादननिर्मिती यातून करण्यात येईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मार्केटिंगबाबतही निपुण केले जाईल, त्यांना बाजारपेठा उपलब्ध करुन दिल्या जातील यातून निश्चित शेतकरी निश्चितच आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सक्षम होईल. हा जिल्हा आत्महत्यामुक्त होईल, असा विश्वास पालकमंत्री श्री.खोतकर यांनी दर्शविला.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा