महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकराज्यमधील ‘परिवर्तनाच्या कथा’ प्रेरणादायी - अश्विन मुदगल गुरुवार, ११ ऑक्टोंबर, २०१८
ऑक्टोबरच्या ‘लोकराज्य’ अंकाचे लोकार्पण

नागपूर :
राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणलेल्या महिला व युवकांच्या ‘परिवर्तनाच्या कथा’ प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘लोकराज्य’ विशेषांकाचे लोकार्पण जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, उपजिल्हाधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. केशव वाळके, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर, हेमंत ब्राम्हणकर, अभय देशमुख आदी उपस्थित होते.

‘लोकराज्य’ मासिक शासनाच्या विविध योजनांसह शासकीय माहिती, नाविण्यपूर्ण उपक्रम, शासनाच्या उपक्रमांची माहिती देणारे मासिक आहे. लोकराज्याच्या प्रत्येक अंकाचे सर्वसामान्यांसह स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थ्यांकडून नियमित वाचन करण्याबरोबर यातील लेखाचे कौतुकही केले जाते. माहे ऑक्टोबरचा अंक हा ‘परिवर्तनाच्या कथा’ यावर आधारित आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा