महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सामाजिक दायित्व स्वीकारुन योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा - अश्विन मुदगल गुरुवार, ११ ऑक्टोंबर, २०१८
युवा माहिती दूतच्या उपक्रमातून शासनाच्या योजना एका क्लिकवर
युवा माहिती दूत जिल्हास्तरीय कार्यशाळा

नागपूर :
माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात शासकीय योजना ई-सेवेच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. ‘युवा माहिती दूत’ उपक्रमातील मोबाईल ॲपशी जुडणाऱ्या प्रत्येक युवकाला शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ५० योजनांची विस्तृत माहिती प्राप्त होणार आहे. माहिती दूत म्हणून कार्य करताना युवकांनी सामाजिक दायित्व स्वीकारुन सर्व ५० योजनांची माहिती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे आज माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, युनीसेफ तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा माहिती दूत’ जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, उपजिल्हाधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. केशव वाळके, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर, हेमंत ब्राम्हणकर, अभय देशमुख आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या माहिती दूत या उपक्रमाच्या माध्यमातून माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करुन लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या सेवा-सुविधांची माहिती पोहचविली जाणार आहे. ही माहिती मोबाईल ॲपच्या माध्यमातून पोहचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्येही योजनाच्या माहितीचा फायदा होणार आहे. शासन आणि लाभार्थी यांच्यातील दुवा म्हणून काम करताना माहिती दूत यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.

राज्यात सन २०१९ मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याकरिता राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार १८ ते १९ या वयोगटात दीड लाख युवक-युवतींचा समावेश आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र ११ हजार युवक-युवतींनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या किंवा १ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्यास माहिती दूतांनी त्यांना प्रेरित करावे. त्यासाठी नवीन मतदार नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर जास्तीत जास्त नवीन मतदारांना ऑनलाईन नाव नोंदणीसाठी युवा माहिती दूतांनी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केल्या.

युवाशक्ती, माहिती व तंत्रज्ञान, शासन योजनांची सांगड घालणे गरजेचे आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगाचा सकारात्मक वापर करुन गरजू वर्गापर्यंत ५० योजनांसह माहिती दूत पोहोचणार आहेत. राज्यात १ लाख युवक अडीच कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. याचा फायदा प्रशासनाला नक्कीच होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केला.

उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा म्हणाल्या, मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गंत १३ व १४ ऑक्टोबर तसेच २७ व २८ ऑक्टोबर रोजी विविध महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याशिवाय १५ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालयांमध्ये नाव नोंदणी करण्यात येणार आहे. या उपक्रमासह सन २०१९ च्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनसंबंधी माहिती दूतांनी जनजागृती करण्याचे आवाहन केले.

युवकांच्या व्यक्तीमत्व विकासाला चालना देण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करते. त्यामुळे शासनाच्या ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेतल्याने कॅम्प तसेच अन्य उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत एनएसएसचे विद्यार्थी पोहोचू शकतील. सध्या जिल्ह्यातील २४० महाविद्यालयातील २६ हजार ७२३ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले असून, भविष्यात ही संख्या वाढेल, असे एनएसएसचे समन्वयक डॉ. केशव वाळके यांनी सांगितले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच युवक ‘युवा माहिती दूत’ योजनेच्या माध्यमातून सामाजिक दायित्व स्वीकारताना शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवतील. या युवकांना शासनाच्या विविध ५० योजनांची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर शासन योजनाच्या माहितीचा लाभ त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी होईल, असे जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी सांगितले.

यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून ‘युवा माहिती दूत’ ॲप डाऊनलोड करण्यापासून ते लाभार्थ्यांच्या अभिप्राय कसा नोंदवावा, यांची विस्तृत माहिती देण्यात आली. याशिवाय उपस्थित समन्वयकांना यावेळी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित हेमंत ब्राम्हणकर, समन्वयक वर्षा भुजबळ यांनी समायोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक संचालक श्रीमती शैलजा दांदळे-वाघ यांनी तर आभार जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा