महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गावाच्या विकासासाठी प्रकल्प,योजना लोकसहभागातून राबविण्यावर भर द्यावा - पालकमंत्री पाटील रविवार, १६ जुलै, २०१७
कोल्हापूर : गावांच्या सर्वांगिण विकासासाठी शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबरोबरच गाव विकासासाठी नव-नवे प्रकल्प आणि संकल्पना शासन योजना आणि लोकसहभागातून राबविण्यावर अधिक भर द्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात देणारा राजर्षी शाहू छत्रपती पुरस्काराचे वितरण तसेच आंतरजातीय व व्यंग अव्यंग विवाहितांचा सत्कार तसेच अनुदानित वसतीगृहातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते आज करण्यात आला. याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री डॉ. विनय कोरे हे होते. समारंभास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील आणि विषय समित्यांचे सभापती उपस्थित होते.

गावाच्या विकासासाठी पाणी हा घटक महत्त्वाचा असून गावागावात पाण्याचे साठे वाढवून त्याचे काटेकोरपणे नियोजन करण्याबरोबरच पीक पद्धती बदल करुन एकेरी उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गावातील उपलब्ध पाण्यावर आणि उपलब्ध जमिनीवर उत्पादन वाढविण्यासाठी नव-नवे प्रयोग शेतकऱ्यांनी हाती घ्यावे यासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी आणि जिल्हा परिषद यंत्रणेने सक्रिय होणे गरजेचे आहे. गावात उपलब्ध असणारे पाणी नियोजनबध्द पद्धतीने वापरणे आवश्यक आहे. ठिबकच्या माध्यमातून खते आणि किटकनाशकेही देणे आता शक्य झाले असून समूह ठिबक प्रणालीला उत्तेजन देण्यासाठी कॉर्पोरेट सेक्टरचेही सहकार्य घेतले जाईल, असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषदेकडील योजनांसाठी शासनाकडील निधी, जिल्हा परिषद सदस्यांचे मानधन वाढ अशा अन्य विकासात्मक बाबींना शासनस्तरावरुन सहकार्य केले जाईल यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अशा प्रस्तावांना मान्यता घेऊन ते प्रस्ताव शासनस्तरावर सादर करावेत त्याचा निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते म्हणाले, पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना सहकार्य व्हावे यासाठी सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करावा. यामध्ये शासनस्तरावरुन मदत, लोकसहभागातून तसेच कॉर्पोरेट सेक्टरकडूनही मदत मिळविण्यास मदत केली जाईल, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी बोलताना माजी मंत्री डॉ. विनय कोरे म्हणाले, जिल्हा परिषदेने ग्रामीण भागाची आवश्यकता आणि गरजा विचारात घेऊन त्यानुसार नव नव्या योजना आखाव्यात. संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच धोरण न राबविता निमशहरी गावे, नदी काठची सदन गावे आणि अतिदुर्गम गावे यांच्यासाठी विकासाचे स्वतंत्र धोरण राबविणे उपयुक्त ठरेल. ते पुढे म्हणाले, ग्रामीण आणि दुर्गम भागातील शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेने 8 वी ते 10 वी शाळा चालविण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ग्रामीण विकास यंत्रणेतील गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या कामावर मोबाईल ॲपद्वारे नियंत्रणे ठेवणे शक्य असून त्यासाठीचा प्रस्ताव उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी पुरस्काराची संकल्पना विषद केली आणि गेल्या तीन महिन्यात जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध विकास कामांची आणि उपक्रमांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, येत्या 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल करण्याचा मानस असून शाळा तेथे प्रयोग शाळा हा उपक्रम हाती घेतला जाईल. भाऊसिंगजीरोडवर असलेल्या जागे बहुमजली पार्किंग करण्याबरोबरच हगणदारीमुक्ती, स्मार्ट ग्राम यामध्ये केलेल्या कामाचा त्यांनी आढावा घेतला.

प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी स्वागत केले. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील, प्रा.अनिता चौगुले, सहाय्यक लेखाधिकारी वसंत गाडे यांनी आपल मनोगत व्यक्त केले. माजी मंत्री विनय कोरे यांना डिलिट पदवी मिळाल्याबद्दल या समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी आभार मानले.

समारंभास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर, समाज कल्याण सभापती विशांत महापुरे, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि नागरीक उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा