महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कुडासे खुर्द झाले लोकराज्‍य ग्राम शनिवार, १५ एप्रिल, २०१७
सिंधुदुर्गनगरी : दोडामार्ग तालुक्‍यातील कुडासे खुर्द लोकराज्‍य ग्राम झाले आहे. आज कुडासे खुर्द येथे आयोजित समारंभात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्‍या उपस्थितीत सरपंच सौ. संगीता देसाई यांनी 6 हजार 100 रुपये लोकराज्‍य वर्गणीचा धनादेश जिल्‍हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांचेकडे सुपूर्द केला.

घरोघरी वाचनीय व उपयुक्‍त लोकराज्‍य
लोकराज्‍य हे शासनाचे मुखपत्र असले तरी विविध माहिती पूर्ण सदर तसेच लेखांचा या मासिकात अंतर्भाव असतो. यामुळे लोकराज्‍य मासिकाचा प्रत्‍येक महिन्‍याचा अंक हा वाचनीय व माहिती पूर्ण असतो असे सांगून पालकमंत्री श्री. केसरकर म्‍हणाले की, घरातील प्रत्‍येकांने वाचावे असे हे मासिक आहे. याचबरोबर स्‍पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्‍यांसाठी लोकराज्‍य अधिक उपयुक्‍त मासिक आहे. कुडासे खुर्द ग्रामस्‍थांनी लोकराज्‍य अंकाची वर्गणी भरून प्रत्‍येक घरात लोकराज्‍य मासिक सुरू करून लोकराज्‍य ग्राम हा बहुमान पटकविल्‍याबद्दल त्‍यांनी यावेळी सर्व ग्रामस्‍थांचे अभिनंदन केले.

सरपंच सौ. संगीता देसाई यावेळी बोलताना म्‍हणाल्‍या की, कुडासे गावातील विद्यार्थी - विद्यार्थींना लोकराज्‍य मासिकाचा चांगला उपयोग होणार आहे. याचसाठीच खास मोहीम घेऊन आम्‍ही ग्रामपंचायतीच्‍या सर्व पदाधिकारी, ग्रामसेवक अमीत दळवी यांच्‍या सहकार्याने लोकराज्‍य वर्गणी जमा केली. सर्व ग्रामस्‍थांबरोबरच विद्यार्थी वर्गाला याचा विशेष लाभ होईल, असा त्‍यांनी विश्‍वास यावेळी व्‍यक्‍त केला.

जिल्‍हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांनी लोकराज्‍य मासिकातील वैविध्‍यपूर्ण लेखाविषयी माहिती देऊन कुडासे खुर्द ग्रामस्‍थांचे यावेळी आभार मानले. यावेळी बाबुराव धुरी, गणेशप्रसाद गवस, तहसीलदार श्वेता पाटोळे, गटविकास अधिकारी आजवेलकर, पंचायत समिती सदस्‍या धनश्री गवस, सुहास देसाई तसेच कुडासे खुर्दचे ग्रामस्‍थ बंधु-भगिनी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा