महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वृक्ष लागवड ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी - पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील रविवार, ०८ जुलै, २०१८


जळगाव :
वृक्षांचा संबंध पर्यावरण व पर्जन्यमानाशी असून दुष्काळाचे संकट टाळण्यासाठी वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन व संगोपन करणे ही समाजातील सर्व घटकांची सामाजिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आव्हाणे येथे केले.

सामाजिक वनीकरण विभागामार्फत आव्हाणे गावांलगत रस्त्यांच्या कडेला एक हजार रोपांच्या लागवडीचा शुभारंभ पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते आज आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, राज्य शासनाने 50 कोटी वृक्ष लागवडीसाठी एक कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करावयाची असून त्यासाठी 1 ते 31 जुलै असा कालावधी निर्धारित केला आहे. समाजात वृक्ष लागवडी विषयी जागरूकता निर्माण झालेली असून ही मोहीम लोकचळवळ झालेली आहे.

मुलगी जन्मास आलेल्या कुटुंबियांना वृक्षारोपणासाठी वन विभागातर्फे मोफत रोपांचा पुरवठा केला जात आहे. 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत आतापर्यंत लागवड केलेल्या रोपांपैकी 85 टक्के रोपे जिवंत आहेत. हे चांगले प्रमाण असून ते वाढविण्यासाठी समाजाचा सक्रिय पाठिंबा आवश्यक आहे. आकाराने मोठ्या रोपांची लागवड करावी जेणे करून ती जगतील तसेच त्यांची वाढही लवकर होईल.

जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी 13 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत जिल्ह्यास दिलेले 43लाख वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टापेक्षा जास्त लागवडीचे नियोजन केले असून जिल्ह्यात 45 लाख वृक्षांची लागवड केली जाईल. यात सर्व विभागांचे सहकार्य असून शिक्षण संस्था, सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे. जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक श्री. पगार यांनी प्रास्ताविक केले. तर सामाजिक वनिकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले.

आव्हाणे फर्स्ट संस्थेतर्फे वृक्षारोपण
आव्हाणे फर्स्ट या संस्थेतर्फे 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत आव्हाणे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिवेकर यांच्यासह ग्रामस्थ ,शालेय विद्यार्थी ,आव्हाणे फर्स्टचे सदस्य उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा