महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मुर्रीत होणार मुलांचे वसतिगृह बांधकाम तातडीने सुरु करा : पालकमंत्री मंगळवार, ०५ डिसेंबर, २०१७
गोंदिया : गोंदिया शहरात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती, विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जमाती व अपंग प्रवर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा निवाऱ्याचा व भोजनाचा प्रश्न सुटावा यासाठी गोंदिया जवळील मुर्री येथे 250 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह मंजूर झाले असून निधीही प्राप्त झाला आहे. तरी या वसतिगृहाचे बांधकाम तातडीने वेळेत पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शासकीय वसतिगृह व निवासी शाळांसाठी जमीन संपादनाचा आढावा घेताना श्री.बडोले बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपवनसंरक्षक एस.युवराज, समाजकल्याणचे सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, जि.प.सदस्य श्री.सोनवाने, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तहसीलदार रवींद्र चव्हाण, अपर तहसीलदार के.डी.मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

पालकमंत्री म्हणाले, 10 कोटी रुपये खर्च करुन अत्यंत चांगली इमारत शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी उपलब्ध होणार आहे. या वसतिगृहात राहून आपल्या जिल्ह्यातील मुले शिक्षण घेणार आहे. भविष्यात ती मोठ्या पदावर सुध्दा जाणार आहे. केवळ विरोध करुन बांधकाम थांबविणे अत्यंत चुकीचे आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रासाठी आपण जर विरोध करीत असू तर चांगला संदेश समाजात जाणार नाही. अत्यंत परिश्रमपूर्वक इथले वसतिगृह मंजूर करुन घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्त लावून वसतिगृहाचे काम सुरु करावे, असे त्यांनी सांगितले.

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह तिरोडा, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्जुनी/मोरगाव, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह देवरी आणि मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सडक/अर्जुनी येथील जमिनीसाठी लवकरच वन विभागाकडून जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मंजुरीपत्र देणार असल्याचे उपवनसंरक्षक एस.युवराज यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा