महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
खरीप हंगामासाठी खते व बियाणांच्या पुरवठ्याचे नियोजन करावे - पालकमंत्री गिरीश बापट गुरुवार, १२ एप्रिल, २०१८
पुणे : यंदा खरिपाच्या एकूण 2.31 लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा वेळेत होण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, अशा पालकमंत्री ‍गिरीश बापट यांनी दिल्या.

येथील विधान भवन सभागृह येथे खरीप हंगाम 2018 आढावा व जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आमदार भीमराव तापकीर, संजय भेगडे, सुरेश गोरे, राहुल कूल, जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक विजयकुमार इंगळे आदी उपस्थित होते.

श्री. बापट म्हणाले, रासायनिक खत विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण या कार्यपद्धतीने जिल्ह्यातील 932 किरकोळ विक्रेत्यांकडे पी.ओ.एस. मशीन कार्यान्वित करण्यात आली आहेत. या सर्व विक्रेत्यांवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेऊन शेतकऱ्यांना खत पुरवठा होईल याची खबरदारी घ्यावी. रासायनिक खतांबरोबरच सेंद्रीय खतांच्या वापर वाढण्यासाठी देखील प्रोत्साहन देऊन योग्य पद्धतीने नियोजन करावे. मागेल त्याला शेततळे हा शासनाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. या अंतर्गत 2016 ते 2018 या कालावधीत एकूण 1989 शेततळे पूर्ण झालेली आहेत. सन 2017- 18 या वर्षात पुणे ग्रामीण मंडळ अंतर्गत 1296 कृषी पंप वीज जोडण्या दिल्या असून प्रलंबित वीज जोडणीसाठी 29 हजार 421 कोटी रक्कमेचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. प्रलंबित कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासाठी पुरेशा क्षमतेने कार्यवाही करावी, अशा सूचना देखील त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांचा आढावाही श्री. बापट यांनी घेतला. मागील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत तसेच या वर्षातील कामे तात्काळ सूरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. विविध विभागांचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी देखील समन्वय राखून प्रलंबित कामे पूर्ण करुन घ्यावीत.

जिल्हाधिकारी श्री. राव यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील 60 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले. उर्वरीत काम देखील युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे. याबरोबरच 274 ठिकाणी गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले असल्याने एप्रिल अखेर पुणे जिल्ह्यात टँकरची आवश्यकता भासणार नाही. लोकप्रतिनिधींच्या सहकाऱ्याने उर्वरीत ठिकाणी देखील गाळ काढण्याचे काम सुरु करुन ते तात्काळ पूर्ण करण्याबाबत सूचना देखील त्यांनी दिल्या.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब अलगढमल यांनी सादरीकरणाद्वारे खरीप हंगाम नियोजनाची माहिती दिली. सन 2018-19 मध्ये संभाव्य पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचे नियोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत नियोजन करण्यात आले आहे. यावेळी लोकप्रतिनिधींनी खरीप हंगामाच्या दृष्टीने विविध सूचना केल्या. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा