महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
रासायनिक खतांना महा सोनखत हाच उत्तम पर्याय - पद्मविभूषण बिंदेश्वर पाठक सोमवार, ०८ ऑक्टोंबर, २०१८
पुणे : रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत खराब होवून मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. सोनखताच्या वापरामुळे जमिनीसह मानवाच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. रासायनिक खतांच्या बरोबरीने सोनखतामुळे उत्पन्न मिळू शकते त्यामुळे महा सोनखत हे रासायनिक खतांना उत्तम पर्याय असून शेतकऱ्यांनी याचाच वापर करण्याचे आवाहन सूलभ स्वच्छता आणि सामाजिक परिवर्तन चळवळीचे संस्थापक पद्मभूषण बिंदेश्वर पाठक यांनी आज केले.

चांडोली, ता. खेड येथील कांदा लसून राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या सभागृहात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटाच्या माध्यमातून विकसित केलेल्या ‘महा सोनखत’ प्रकल्पाचा शुभारंभ व महिला बचतगट सक्षमीकरण कार्यशाळेचे उद्घाटन पद्मभूषण बिंदेश्वर पाठक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री. पाठक बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, आमदार सुरेश गोरे, खेड पंचायत समितीच्या सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास गायकर आदी उपस्थित होते.

श्री. पाठक म्हणाले, पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाला देशभरात लोकचळवळीत परावर्तीत केले आहे. महा सोनखत प्रकल्प स्वच्छ भारत अभियानाचे पुढचे पाऊल असून या माध्यमातून महिला बचत गटांना चांगली रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. देशभरात सुरू असणाऱ्या स्वच्छ भारत अभियानामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्पप्नांची पुर्तता होत आहे.

डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, महा सोनखत प्रकल्पामुळे महिला बचत गटांचे सशक्तीकरण होणार आहे. रासायनिक खतांच्या वापरांमुळे जमिनीसह मनुष्याच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. यामुळे जमिनी नापिक होत असून मानवाला विविध दुर्धर आजारांचा सामना करावा लागत आहे. रासायनिक खतांना सोनखत हा चांगला पर्याय आहे. महिला बचत गटांना प्रशासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मोरोशी येथील प्रगती बचत गटाला महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्यावतीने खताची मागणी नोंदवून त्या बदली त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच महाखताच्या नवीन पॅकिंगचे अनावरण करून महा सोनखताच्या माहिती पत्राचे प्रकाशन करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा