महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पाणी टंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीच्या आढाव्यासाठी ग्रामसेवकांची सभा बुधवार, १५ मे, २०१९


अकोला
: जिल्ह्यातील पाणी टंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांची आढावा बैठक नियोजन भवनात घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गटविकास अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर सकाळी ठराविक वेळेस पाणी टंचाई व चारा टंचाईचा आढावा घ्यावा, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, ग्रामसेवक हे ग्रामीण भागाशी निगडीत असतात, त्यांना आपल्या गावाची संपूर्ण माहिती असते. कोणत्या गावात किती प्रमाणात पाणी टंचाई, चारा टंचाई आहे याबाबत संपूर्ण माहिती असते. गावातील पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देवून हा प्रश्न तातडीने सोडवावा. तसेच अधिकाऱ्यांनी पाणी टंचाईच्या कामाच्या संदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र व इतर कामे तातडीने करावीत.

ज्याठिकाणी हातपंप चालू नाहीत किंवा पाणीपुरवठा योजनेत अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या कामासाठी वेळ होत असेल अशा ठिकाणी तातडीने टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा. भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे काही ठिकाणाच्या बोअर आटल्या आहेत. बोअरव्दारे कमी प्रमाणात पाणी येत आहे. अशाठिकाणी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सबमर्शियल पंप बसविण्यबाबतचे प्रस्ताव त्वरीत पाठवावेत, अशा सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

ज्या गावातील बोअरवेल व विहिरींना कमी किंवा पाणी नसेल अशा बोअर विहिरींच्या परिसरात वाटर रिर्चाजिंगचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात यावेत. यावेळी पाणी टंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीचा गावनिहाय आढावा घेण्यात आला. या बैठकीला गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा