महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अंजूमन उर्दु हायस्कूलमध्ये लोकराज्य वाचक मेळावा शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८
यवतमाळ : येथील अंजूमन उर्दु हायस्कूलमध्ये इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांचा लोकराज्य वाचक मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाला उर्दु हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहम्मद अहसामूर रहीम, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, शाळेतील शिक्षक नदीम नियाजी, फिरोज खान, अब्दूल रफिक, नजमूल असरा, सबा नसरीन आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मुख्याध्यापक मोहम्मद रहीम म्हणाले, ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण मराठीत प्रसिध्द आहे. याचाच अर्थ ‘पढेंगे तो ही बचेंगे’ असा असून पुस्तक हाच विद्यार्थ्यांचा खरा मित्र आहे. महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे मासिक मराठी भाषेशिवाय उर्दुमध्येसुध्दा प्रकाशित होत असते. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. लोकराज्यमध्ये नागरिकांसाठी असलेल्या विविध योजना, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती, शासननिर्णय आदींची माहिती असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उर्दु लोकराज्य वेळात वेळ काढून वाचणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकराज्य हे शासनाचे मुखपत्र आहे. शासनाच्या कल्याणकारी योजना, धोरणात्मक निर्णय तसेच राज्यातील विविध विषयांवरच्या यशकथा यात समाविष्ट असतात. स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत महत्वाचे मासिक आहे. उर्दु लोकराज्य हे मासिक दरमहा विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध करून दिले जाईल, असे जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी 15 ते 20 मिनीटे उर्दु लोकराज्यचे सामूहिक वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन नदीम नियाजी यांनी तर आभार फिरोज खान यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा