महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
येणारी पाच वर्ष बीड जिल्ह्यात उद्योगाच्या क्रांतीचा काळ - पालकमंत्री पंकजा मुंडे रविवार, ०४ ऑगस्ट, २०१९


बीड :
जिल्ह्यात जलयुक्त शिवार आणि नदीजोड प्रकल्पामुळे जिल्ह्यात पुरेसे पाणी उपलब्ध होणार असून राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे याच बरोबर रेल्वे विकासही होत असून याद्वारे पायाभूत विकासाची अनेक कामे झाले आहेत. यामुळे येत्या पाच वर्षांमध्ये उद्योग विकासासाठी प्रयत्न केले जाणार असून विविध उद्योग जिल्ह्यात उभारले जातील, हा उद्योगातील क्रांतीचा काळ ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वैद्यकीय अधिकारी -कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने यांच्या नवीन सुसज्ज इमारतींचे उद्घाटन संपन्न झाले. याच बरोबर त्यांनी पानगाव -धर्मापुरी या ८६ कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन केले यावेळी सदर कामांच्या शिलालेखांचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले . यावेळी झालेल्या समारंभास व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार , सभापती संतोष हांगे, सदस्य राणा डोईफोडे, प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर , जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संगिता पाटील, आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉ एकनाथ माले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार, बिभीषन फड, शिवाजी गुट्टे , राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

श्रीमती मुंडे म्हणाल्या मराठवाड्याला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी नदीजोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला आहे. याबरोबरच रस्त्यांचे मोठे जाळे देखील जिल्ह्यात तयार झाले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय महामार्गांची कामे पूर्णत्वाकडे वाटचाल करीत असून जिल्ह्याचा कायापालट झाला आहे . विकासाचे काम करताना जिल्ह्याचे वातावरण बदलले असून एक विकासात्मक चांगले वातावरण असणारा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनकल्याणाच्या अनेक योजना राबविल्या आहेत. आयुष्यमान भारत योजनेतून जनतेच्या आरोग्यासाठी मोठे काम होत आहे याच बरोबर उज्वला योजनेतून प्रत्येक कुटुंबाला गॅस जोडणी देण्याचे काम केले जात आहे. सर्वसामान्यांचं जीवन सुखी होईल याकडे प्रयत्न केले जात असून शेतकऱ्यांच्या साठी देखील अनुदान, नुकसानभरपाई , पीक विमा योजना आदीतून मोठा निधी दिला जात आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना १०० टक्के पीकविमा भरपाई दिली जाईल, यासाठी मी कटिबद्ध आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

श्रीमती गोल्हार म्हणाल्या,  श्रीमती मुंडे यांनी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, अंगणवाड्या यांच्या इमारतींच्या विकासासाठी व बांधकामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला.श्री. धरमकर म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध झाल्याने असंख्य विकास कामे झाल्याचे दिसून येत आहे आणि याबाबत विविध गावच्या सरपंचांनी व्यक्त केलेली मनोगते महत्त्वाचे आहेत.

श्री बाणे यांनी धर्मापुरी ते पानगाव हा राष्ट्रीय महामार्ग दोन महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा टप्पा असून मुख्य मार्गावर बरोबरच त्याच्या दोन्ही बाजूस दीड मीटर रुंदीचे दुचाकी वाहनांसाठी चे रस्ते, बैलगाडी व जनावरांसाठी चे कॅटल बायपास तसेच ठराविक अंतरावर बस थांबे अशा पद्धतीने एक चांगला महामार्ग २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे.

आरोग्य आरोग्य उपसंचालक डॉ. माले म्हणाले धर्मापुरी येथे लोकार्पण झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र ओपीडी ,आयपीडी , ऑपरेशन थिएटर , रूग्ण कक्ष आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने यामुळे सुसज्ज असून यासाठी शासनाने पाच कोटी रुपये निधी खर्च केला आहे असे त्यांनी सांगीतले .

याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती श्री हांगे, तसेच परळी तालुक्यातील हाळम, हेळम, गुट्टेवाडी येथील सरपंचांनी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या विकास कामांचा उल्लेख करून समाधान व्यक्त केले.

यावेळी पालक मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थी व्यक्तींना योजनेचे कार्ड प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. धर्मापुरी येथील जवळपास एक हजार नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत असून यातील निवडक पाच ते सात व्यक्तींना सदर कार्ड देण्यात आले. तसेच अटल महापणन योजनेत निवड झालेल्या जिल्ह्यातील ८३ संस्थांना प्रत्येकी वीस लाख रुपये शासकीय अनुदान आणि कर्ज मंजुरीचे आदेश प्रातिनिधिक स्वरूपात मंत्रीमहोदयांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा