महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी घेतला विविध विभागांचा आढावा शुक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०१८
पालघर : आपले सेवा केंद्र अंतर्गत पुरविण्यात येणार विविध सेवांचा व्यापक प्रसार व प्रचार होऊन या लोकसेवांचा जास्तीत जास्त नागरिकांना फायदा व्हावा यासाठी ग्रामसेवकांनी विविध माध्यमातून जनजागृती करावी अशा सूचना महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त श्री. स्वाधीन क्षत्रिय यांनी दिल्या.

महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 अंमलबजावणी बाबत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन जव्हार येथील आदिवासी भवन येथे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील पात्र व्यक्तींना, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता तसेच लोकांच्या स्थानिक प्रशासनाकडून वाढत्या अपेक्षा विचारात घेऊन तत्पर सेवा पुरविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश -२०१५ हा २८ एप्रिल २०१५ रोजी लागू कारण्यात आला. या अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त श्री. क्षत्रिय दोन दिवस पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जव्हार येथील विविध कार्यालयांना भेटी देऊन आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, लोकसेवा हक्क आयोगाचे उपसचिव संजय काटकर, उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, आदिवासी विकास विभाग जव्हारचे प्रकल्प अधिकारी नवनीत कौर, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण आदी उपस्थित होते.

तहसील कार्यालय जव्हार येथे स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते गोष्टीरुप जमीन व्यवहार फलकचे उद्घाटन व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जव्हार पोलीस स्थानकास भेट देऊन सेवाचा आढावा घेतला यावेळी अपर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी कनेक्टींग पालघर या उपक्रमाविषयी सादरीकरण केले.

यावेळी श्री. क्षत्रिय म्हणाले, ग्रामपंचायतीमध्ये विहित मुदतीत सेवा देत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. सेवा ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. नागरिकांना ऑनलाईन अर्ज करता आले पाहिजे आपले सरकार सेवा केंद्राच्या मार्फत 438 सेवा देण्यात येतात. या विविध विभागाच्या सेवा आहेत त्यासाठी वेगवेगळ्या विभागाकडे जाण्याची गरज नाही. आपले सरकार हे केंद्र हे दुहेरी फायदे देणारे आहे. याबाबत जनजागृती करण्याचे काम मोहिम स्वरुपात घ्यावे. आदिवासी लोकांमध्ये जागृती करण्याचे काम ग्रामसेवकांनी करावे. शासनाच्या योजना लोकांपर्यंत ग्रामसेवकांनी प्रभावीपणे पोहोचवावी. आपले सरकार संकेतस्थळ वापरण्यास खूप सोपे आहे. अर्जदाराने स्वघोषणा पत्र द्यावे. तसेच प्रमाणित करुन घेण्याची आवश्यकता नाही. सुधारणा लोकांच्या फायद्यासाठी आहे. सेवा पारदर्शक व विहित मुदतीत द्याव्यात. ज्या-ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी या कायद्याबद्दल माहिती द्यावी. हा क्रांतिकारी कायदा करुन सेवा हा लोकांचा अधिकार बनला आहे. लोकांना सेवा देण्यासाठी आपण आपले कर्तव्य पार पाडावे, असेही श्री. क्षत्रिय यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले. त्यांनी तीन तालुक्याच्यां ग्रामसेवकांसाठी याकार्यशाळेचे आयोजन केले आहे. आपले सेवा केंद्र च्या माध्यमातून गावातच सेवा मिळणार आहे. 438 सेवांची माहिती ठळकपणे ग्रामपंचायतीत लावण्यात आल्या असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामसेवकांना येणाऱ्या अडचणी समस्या यावर चर्चा करण्यात आली. आभार प्रदर्शन ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण, यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा