महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तयारीत लोकराज्यचा मोलाचा वाटा -तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८
भंडारा : शासनाच्या योजना, निर्णय व ध्येयधोरण याबाबत अधिकृत माहिती देणारे लोकराज्य हे एकमेव मासिक असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मासिक अतिशय उपयुक्त आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत लोकराज्यचा मोलाचा वाटा असतो. आपल्या यशात लोकराज्यचे मोलाचे योगदान असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने लोकराज्यचे वाचन करणे आवश्यक असल्याचे मत परिविक्षाधीन तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे यांनी व्यक्त केले. जिल्हा माहिती कार्यालय व भंडारा पॅरामेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने लोकराज्य वाचक अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विनोद देशमुख होते. भंडारा पॅरामेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. अनिल कुर्वे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, प्रा. नीता चुटे, प्रा. रेखा नानोटी, प्रा. अश्विनी चिचमलकर, प्रा. अंजली कडव व प्रा. भाग्यश्री चिलवतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोकराज्य वाचक अभियान मेळाव्याचे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांनी दीप प्रज्वलन करुन उद्घाटन केले. यावेळी लोकराज्यच्या सप्टेंबर महिन्याच्या सामर्थ्य शिक्षणाचे समृध्द महाराष्ट्राचे या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

लोकराज्य हे शासनाचे मुखपत्र असून शासनाच्या विकास कामाचा तसेच योजनांचा लेखा जोखा या मासिकात अंतर्भूत असतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना या माहितीचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. आपण महाराष्ट्र आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत असताना लोकराज्य मासिकाचे नियमित वाचन करुन टिपण घेत होतो. याचा परीक्षेत फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाच्या विविध योजना व शासन निर्णय याबाबत लोकराज्यमध्ये सविस्तर माहिती दिलेली असते. शासन व जनता यांच्या मधील दुवा साधण्याचे काम लोकराज्य हे मासिक करीत असते. लोकराज्यच्या माध्यमातून शासन आपल्या योजना घरोघरी पोहचविण्याचे काम करीत आहे, असे संचालक डॉ. अनिल कुर्वे यांनी आपल्या भाषणात सांगितले. अभ्यासक्रमासोबत लोकराज्य मासिकाचे नियमित वाचन केल्यास शासनाच्या विविध घडामोडींची माहिती होण्यास मदत होते, असे ते म्हणाले.

लोकराज्य मासिकात शासनाच्या योजनासह शेती, जलसंधारण, रोहयो, सामाजिक न्याय व आदिवासी विकासाच्या यशकथा नियमित दिल्या जातात. यावरुन अनेकांना प्रेरणा मिळत असून लोकराज्यच्या विविध विशेषांकातून थोरपुरुषांचे कार्य समाजापर्यंत पोहचण्याचे काम शासन करीत असल्याचे मत प्राचार्य डॉ. विनोद देशमुख यांनी व्यक्त केले. लोकराज्य वाचक अभियान हे लोकराज्य घरोघरी पोहचण्यासाठी आयोजित करण्यात आले असून यामाध्यमातून शासन आपल्या दारी ही संकल्पना साकार करण्याचा हेतू असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी प्रास्ताविकात सांगितले.

यावेळी तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारी विषयीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. उपस्थितांचे आभार व कार्यक्रमाचे संचलन प्रा. नीता चुटे यांनी केले. या कार्यक्रमास पॅरामेडिकल कॉलेजचे विद्यार्थी , विद्यार्थींनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा