महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पाण्याचे समन्यायी वाटप जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प राबविणार - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९
अप्पर वर्धाचे पाणी महादेव प्रकल्पात सोडणार

अमरावती :
पाण्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प राबविण्यात येईल. प्रारंभीच्या टप्प्यात अप्पर वर्धा प्रकल्पातील पाणी महादेव प्रकल्पात सोडण्यासाठी प्रकल्प जोड कार्यक्रम नाविन्यपूर्ण योजनेत राबविण्यात येईल, अशी घोषणा कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे केली.

जिल्ह्यातील कामकाजाबाबत जिल्हा प्रशासनाची बैठक पालकमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहात घेतली व त्यानंतर पत्रकार संवाद साधला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, पाण्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी नदीजोड प्रकल्प पुढील पाच वर्षांत अधिक विस्तृतपणे राबविण्यात येईल. अप्पर वर्धा प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे महादेव प्रकल्पात पाणी सोडण्यात येईल. पंढरी मध्यम प्रकल्पात क्रेस्ट लेव्हलपर्यंत २४ दलघमी पाणीसाठा क्षमता निर्मिती झालेली आहे. उर्वरित पाणीसाठी (६२.२९ दलघमी) मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पाईप ड्रिस्ट्रीब्युशनचे सुरु करण्यात आले आहे. पाक नदी प्रकल्प व चांदस लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम जून २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

विविध योजनांचा अधिकाधिक शेतकरी बांधवांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत. प्रत्येकाची वैयक्तिक मागणी, तक्रार लक्षात घेऊन तिचे निराकरण करण्यात येत आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत ६ हजार ६१ शेतकरी व नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत ३५ हजार २२६ अर्जांना पूर्व संमती दिली आहे. त्यानुसार शेतकरी बांधवांनी आवश्यक पूर्तता करून लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत १ लाख ६९ हजार शेतकऱ्यांना ७६१ कोटी ३० लक्ष रुपये कर्जमाफी मिळाली आहे. जे शेतकरी ग्रीन लिस्टमध्ये आहेत, त्यांची नावे व कर्ज लक्षात घेऊन शासनाकडून आवश्यक निधी मिळवून घ्यावा, असे आदेश बँकांना दिले आहेत. पुनर्गठनासाठी पात्र शेतक-यांच्या समावेशासाठी प्रयत्न होत आहेत. बँकांनाही निर्देश दिले आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप करण्यात येणार आहे. कर्जमाफीसाठी सहायक निबंधक पातळीवर समिती केली आहे. पात्र शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यंदा ४७ हजार ४५० शेतकरी बांधवांना ५३९.५८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले.

वाळलेल्या संत्रा झाडांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत ८२ हजार प्रतिहेक्टर मदत दिली जात आहे व संत्रा पुनरुज्जीवन योजनाही कार्यान्वित करण्यात आली आहे.

वीज वितरण सुरळीत राहण्यासाठी प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्यूशन सिस्टम राबविण्यात येत आहे. पाच हजार ट्रान्सफॉर्मर उपलब्ध झाले आहेत. उपकेंद्राची संख्या वाढली आहे. शेततळ्यासाठी सौर ऊर्जा पंप उपयुक्त आहे. त्यामुळे त्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून ८० टक्के अनुदानाचा लाभ मिळतो. बिरसा मुंडा योजनेत ९० टक्के अनुदान देण्यात येते. शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा. सामाजिक न्याय विभागातर्फे रमाई आवास योजनेत १४८० घरकुलांना मान्यता दिली आहे. सर्वांसाठी घरे देण्याचे ध्येय आहे. अधिकाधिक अर्ज येतील या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावे, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

कृषी यांत्रिकीकरण योजनेत वैयक्तिक अनुदान मिळतेच; पण बचत गट किंवा शेतकरी कंपनीला अवजार, ट्रॅक्टर आदी अवजार बँकेसाठी ६० टक्के अनुदान देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा