महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
समाज माध्यमांचा वापर विवेकबुद्धीने करावा - जिल्हाधिकारी सचिन कुर्वे मंगळवार, १३ मार्च, २०१८
नागपूर जिल्हा व नागपूर ग्रामीण ‘महामित्र संवाद सत्रा’ला उस्फूर्त प्रतिसाद

नागपूर :
जागतिकीकरणामुळे आज सोशल मीडियाचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीची विविध दालने खुली झाली आहे. परंतु समाज माध्यमांतील माहितीचा वापर नीर-क्षीर बुद्धी जागृत ठेऊन करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूरच्या वतीने नागपूर जिल्हा व नागपूर ग्रामीण भागासाठी सोशल मीडिया महामित्र अंतर्गत ‘संवादसत्र’ कार्यक्रम सीताबर्डी येथील माहिती केंद्रात आयोजित करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, नगरसेविका श्रीमती उज्ज्वला शर्मा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, विभागीय माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर, अभय देशमुख आदी उपस्थित होते.

सोशल मीडियाबाबत गटचर्चेतील सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे म्हणाले, समाज माध्यमांचा समाज मनावर मोठा परिणाम होतो. सोशल मीडियामुळे आज क्षणात माहितीचा प्रचंड साठा उपलब्ध होत आहे. त्यातून नेमकी कोणती माहिती घ्यावी, कोणत्या बातमीवर विश्वास ठेवावा, यासाठी आपली विवेक बुद्धी जागृत ठेवून निर्णय घ्यावा. सोशल मीडियाचा विधायक कार्यासाठी उपयोग व्हावा, असेही ते यावेळी म्हणाले.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, देशातील युवक-युवती हे देशाचे भविष्य आहे. समाजातील युवकांचे विचार कोणत्या दिशेने जात आहे, यावर त्या देशाचे भवितव्य अवलंबून असते. समाज माध्यमातून आज समाजमन अस्वस्थ करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जातात. समूहाचे मानसशास्त्र समजणे अवघड राहते. काही समाजकंटक याचा फायदा घेऊन जुन्या बातम्यांना वेगळी कलाटणी देऊन त्या बातम्या प्रसारित करतात. यामुळे जनक्षोभ उसळून समाजस्वास्थ ढवळून निघाल्याचे उदाहरणे आपण बघतो. समाजात समाज माध्यमांबद्दल जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. संवादपर्वाच्या निमित्ताने दुसऱ्याचे मत ऐकूण घेण्यासाठी उत्तम व्यासपीठ विद्यार्थ्यांना मिळाले आहे. हा उपक्रम पोलीस विभागाला देखील सहाय्यभूत ठरणार आहे.

प्रास्ताविक करताना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे राधाकृष्ण मुळी यांनी संवादपर्व व सोशल मीडिया या उपक्रमाची माहिती उपस्थिताना दिली. ते म्हणाले, या संवादपर्वासाठी शहरी भागासमवेतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय आहे. समाज माध्यमांच्या विधायक उपयोगितेबद्दल ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील उत्सूक आहे.

संवादपर्व कार्यक्रमध्ये सोशल मीडियाबाबत जनजागृती करण्यासाठी सहा गटांमध्ये चर्चा झाली. शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी गटातील सहभागींना महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असणारे लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार करुन घेण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र वार्षिकीची प्रत प्रत्येक सहभागींना भेट स्वरुपात देण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर आणि केशव करंदीकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार श्रीमती अपर्णा डांगोरे - यावलकर यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा