महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शासन-प्रशासन आणि जनतेच्या समन्वयाने काम करुन टंचाईवर मात करु - पालकमंत्री दिलीप कांबळे शुक्रवार, १० मे, २०१९


पालकमंत्री कांबळे यांनी दिला टंचाईग्रस्तांना दिलासा

हिंगोली :
राज्यात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून, त्यावरील उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी आज जिल्ह्यात टंचाईग्रस्त परिस्थितीचा पाहणी दौरा करुन नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या टंचाईग्रस्त परिस्थितीवर शासन -प्रशासन आणि जनतेच्या समन्वयाने कामे करुन मात करु असा दिलासा श्री. कांबळे यांनी यावेळी दिला.

आज पालकमंत्री श्री. कांबळे यांनी हिंगोली तालुक्यातील रायपूरवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधुन सद्य:स्थितीत पाण्याची उपलब्धता, चालू टँकर आणि अधिग्रहण करण्यात आलेल्या बोअर-विहरींची माहिती घेवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच गावात टँकर आल्यानंतर नागरिकांनी घाई-गडबड न करता पाणी भरुन घ्यावे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा व पाण्याचा काटकसरीने वापर करावा अशा सूचनाही श्री. कांबळे यांनी ग्रामस्थांना दिल्या.

हिंगोली तालुक्यातील माळसेलू गावातील ग्रामस्थांच्या श्री.कांबळे यांनी समस्या जाणून घेतल्या. तसेच गावाकरिता टँकरच्या चार ट्रीप केल्या जातील आणि वन्यजीव प्राण्यांपासून गावाला होणाऱ्या त्रासाबद्दल वन विभागास सूचना केल्या जातील. तसेच माळसेलू गावांने ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी केले.

सेनगाव तालुक्यातील मौजे ब्राम्हणवाडा या गावास श्री. कांबळे यांनी भेट देवून टंचाईग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. याठिकाणी दोन बोअरचे अधिग्रहण केल्याने गावातील पाणी प्रश्न सुटला असल्याचे ग्रामस्थांनी पालकमंत्री श्री. कांबळे यांना माहिती दिली. तसेच त्यांनी मौजे ताकतोडा ता. सेनगाव येथेही जाऊन पाणीटंचाई बाबत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी दौऱ्यात विविध पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा