महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक हजार जणांना कर्ज उपलब्ध करून द्या- पालकमंत्री गुरुवार, १७ मे, २०१८
कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मुद्रा योजनेतून यावर्षी किमान एक हजार तरूण-तरूणींना उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मुद्रा बँक योजनेच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील विविध बँका, जिल्हास्तरीय मुद्रा बॅंक समन्वय समिती यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहूल माने, नाबार्डचे नंदू नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव आदी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मुद्रा योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुशार व होतकरू बेरोजगारांना उद्योगप्रवण करण्यासाठी सुरू केलेली अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा गाभा समजून योजना राबवा. ज्यांच्याकडे इच्छा आहे, स्वप्न आहेत, उमेद आहे पण तारण व जामिन नाही अशा लाखो तरूणांचे स्वयंरोजगाराचे स्वप्न या योजनेमुळे साकार होणार आहे. तथापि योजनेच्या मूळ उद्दिष्टालाच बगल देत बँका ज्यांचे व्यवसाय सुरू आहेत व परतफेडीची खात्री आहे अशाच त्यांच्या ग्राहकांना या योजनेतून कर्ज देताना दिसत आहे. हे यापुढे सहन केले जाणार नाही.

यावेळी त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या तरूण-तरूणींना व्यवसाय उद्योगासाठी मुद्रा बँक योजनेतून घेतलेल्या दहा लाख रूपयांपर्यतच्या कर्जाचे व्याज शासनामार्फत देण्यात येणार आहे. जिल्ह्यात यावर्षी किमान एक हजार तरूण-तरूणींना या योजनेअंतर्गत कर्ज देऊन व्यवसाय - उद्योगासाठी मदत करण्यात येईल. यासाठी प्रत्येक तालुक्यात समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ते इच्छूक स्वयंरोजगरासाठी तरूण-तरूणींना कागदपत्रे, प्रस्ताव तयार करणे,बँकांकडे पाठपुरावा यासाठी मदत करतील.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा