महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मतदानाकरिता अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज शनिवार, १३ एप्रिल, २०१९


अमरावती
: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात अमरावती लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिलला मतदान होत असून, त्यादृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनी यादिवशी आपले मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

जिल्ह्यात स्वीप मोहिमेत सर्वदूर जनजागृतीसह आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. स्वीप मोहिमेत विविध विभागांनी गावोगाव शेकडो कार्यक्रम, ईव्हीएम- व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिके घेतली आहेत. मतदाराचे हक्क, कर्तव्य व जाणीवजागृतीचे कार्य या मोहिमेतून होत आहे. या मोहिमेत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामसेवक, ग्राम रोजगारसेवक यांच्यासह सर्व यंत्रणाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. नागरिकांनीही मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

निवडणूकीसाठी मनुष्यबळाला तीन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे. ईव्हीएम- व्हीव्हीपॅट यंत्रणेच्या तपासण्या, सरमिसळीकरण आदी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रावर लागणा-या सुविधांबाबत यापूर्वीच निर्देश देण्यात आले असून, तशी तजवीज करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, पीडब्ल्यूडी ॲप आदी सुविधा आहेत. दिव्यांग मतदारांत जागृतीसाठी कार्यशाळाही घेण्यात आल्या आहेत. नवमतदारांमध्ये जागृतीसाठी पथनाट्य, प्रात्यक्षिके, सेल्फी पॉईंट असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

एक्झिट पोलला मनाई

लोकसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय मतदान होणाऱ्या मतदार संघात मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे जनमत चाचण्याचे अंदाज (ओपीनिअन पोल) जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दि. 18 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. त्यानुसार दि. 17 व 18 एप्रिल रोजी वृत्तपत्रांत प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती 15 तारखेपर्यंतच सादर करणे व ‘एमसीएमसी’कडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे.

‘एमसीएमसी’कडून खापर्डे बगिचास्थित जिल्हा माहिती कार्यालयात प्रमाणीकरणाचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांनी माध्यमांतून तीनवेळा जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. संबंधितांनी याबाबत नोंद घेऊन जाहिराती व खर्चाबाबत माहिती सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा