महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालखी मार्गांची पाहणी करुन तिन्ही जिल्ह्यातील पालखी तळांच्या कामांना सुरूवात - चंद्रकांत दळवी शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८
पुणे : केंद्र सरकारने राज्यातील पालखी मार्गांना राष्ट्रीय मार्गाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे विभागातील पालखी मार्गांचा विकास राज्याच्या निधीतून करायचा की केंद्राच्या निधीतून करायचा यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पालखीचे विश्वस्त यांनी येत्या आठ दिवसात संयुक्त पाहणी करुन घ्यावी. त्यानंतर नियोजित आराखड्याप्रमाणे पालखी तळांच्या विकास कामांना सुरूवात होईल, अशी माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज दिली.

पालखी मुक्कामांच्या ठिकाणांची मंजूर कामे व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयाकडून करण्यात येणाऱ्या कामांबाबत समन्वयाची बैठक विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, संत तुकाराम महाराज संस्थानचे पंढरीनाथ उर्फ बाळासाहेब मोरे, सुनिल मोरे, अशोक मोरे, विठ्ठल मोरे, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त डॉ.अजित कुलकर्णी, सोपान महाराज संस्थानचे विश्वस्त गोपाळ गोसावी, तीर्थक्षेत्र विकासचे उत्तम चव्हाण उपस्थित होते.

चंद्रकांत दळवी म्हणाले, पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाकांच्या पालखी पंढरपूरला जातात. या तिन्ही पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गांना केंद्र सरकारने राष्ट्रीय मार्गाचा दर्जा दिला आहे. पालखी मार्ग व पालखी तळ मुक्कामाचा विकास करण्यासाठी तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यांतर्गत राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे, त्याचबरोबर केंद्र सरकारचा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा निधीही आहे. या पालखी मार्गांचा आणि पालखी तळांचा विकास कोणत्या निधीतून करावयाचा यासाठी येत्या आठ दिवसात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, संबंधित जिल्हाधिकारी आणि पालखीचे विश्वस्त यांनी येत्या आठ दिवसात संयुक्त पाहणी करावयाची आहे. त्यानंतर पालखी तळ व मार्गाच्या मंजूर आराखड्यानुसार कोणत्या निधीतून कोणती कामे करावयाची ते ठरवता येईल. त्यानंतर या विकास कामांना सुरूवात होणार आहे.

त्याचबरोबर माळीनगर कारखान्याच्यावतीने प्रतिवर्षी येणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था कारखान्याच्या जागेत करण्यात येते. ही जागा कारखान्याने शासनाच्या नावावर केल्यास त्याठीकाणी या निधीतून पालखी तळ विकासकामे करण्यात येणार आहेत. कारखान्याने जागा हस्तांतरीत करण्यास मान्यता दिली आहे, ही जागा हस्तांतरीत झाल्यानंतर या ठिकाणी विकास कामांना सुरूवात होणार असल्याचे श्री.दळवी यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, तीर्थ क्षेत्र विकास आराखड्याच्यावतीने संभावित कामांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी विविध कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पालखी मार्ग ज्या भागातून जातो त्या ठिकाणचे प्रांताधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा