महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
‘राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार-२०१७’ प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते तीन मराठी वैज्ञानिकांचा सन्मान बुधवार, १६ मे, २०१८
नवी दिल्ली : भूविज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी नरेंद्र नितनवरे, डॉ.साहेबराव सोनकांबळे आणि अमीत धारवाडकर या मराठी वैज्ञानिकांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाच्या वतीने येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार-२०१७’ प्रदान करण्यात आले. यावेळी खनिकर्म मंत्रालयाच्या विविध संशोधन संस्थांमध्ये कार्यरत २२ वैज्ञानिकांना भूविज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय खनिकर्म मंत्री नरेंद्रसिंह तोमर, खनिकर्म राज्यमंत्री हरिभाई पार्थीभाई चौधरी आणि मंत्रालयाचे सचिव अनिल मुकीम मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात ३ मराठी वैज्ञानिकांचा सन्मान करण्यात आला.

चंद्रपूर जिल्ह्यातील मिनझारी येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण केंद्राचे उपमहासंचालक व वैज्ञानिक नरेंद्र नितनवरे यांनी आर्थिक महत्त्वाच्या खनिजांचा शोध लावला आहे. त्यांनी या शोधासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण केंद्राच्या पाच सदस्यीय वैज्ञानिकांच्या संघात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या कार्यक्रमात श्री. नितनवरे यांचा सन्मान करण्यात आला.तीन लाख रुपये आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असून हा सांघिक पुरस्कार आहे.

वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेचे वैज्ञानिक डॉ. साहेबराव सोनकांबळे यांनी देशात हेलिबॉर्न विद्युत चुंबकीय सर्वेक्षणाच्या माध्यमातून भूजल संशोधनात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी या शोधासाठी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या चार सदस्यीय वैज्ञानिकांच्या संघात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या कार्यक्रमात श्री. सोनकांबळे यांचा सन्मान करण्यात आला. तीन लाख रुपये आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असून हा सांघिक पुरस्कार आहे.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेचे संचालक व वैज्ञानिक अमित धारवाडकर यांनी अंटार्टिक व आर्कटिक मोहिमेत भाग घेऊन आपल्या चार सदस्यीय वैज्ञानिकांच्या संघासह अंटार्टिक व आर्कटिक संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या योगदानासाठी आज त्यांना सन्मानित करण्यात आले. तीन लाख रुपये आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असून हा सांघिक पुरस्कार आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा