महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी बँक अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे- एम.डी. सिंह गुरुवार, १३ जुलै, २०१७
बीड : शासनाने खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपले बँक खाते असलेल्या बँकेच्या शाखेत पीक विमा रक्कम 31 जुलैपूर्वी भरणा करावा. तसेच बँक अधिकाऱ्यांनी याकामी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2017-18 जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश भताने, युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे रिजनल मॅनेजर श्री. दामले आदींची उपस्थिती होती.

श्री.सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा मोबदला मिळावा यासाठी शासनाने खरीप हंगाम 2017-18 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेचा उपयोग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी करुन घेणे गरजेचे आहे. पीक विमा रक्कम बँकेत भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2017 असून या तारखेपूर्वीच सर्व शेतकऱ्यानी पीक विमा भरणा करावा. पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते ज्या बँकेत आहे त्याठिकाणी पीक विमा रक्कम भरणे आवश्यक आहे. पीक विमा भरणा करताना शेतकऱ्यांनी त्यांचा सातबारा उतारा, पीक पेरणी प्रमाणपत्र, फोटो, आधार कार्डाची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांनी पीक विमा भरुन घेताना आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची पुर्तत: करणाऱ्या शेतकऱ्यांचा तत्काळ पीक विमा रक्कम भरणा करुन घ्यावा. बँकेला पीक विमा भरण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची माहिती सर्वांना दिसेल, अशा दर्शनी भागात लावावी. याकामी शेतकऱ्यांना बँक अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे व जास्तीत जास्त पीक विमा भरुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत, महसूल, कृषी, बँक व इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एकमेकाशी समन्वय ठेवून शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी मदत करावी. तसेच एकाच सातबाऱ्यावर अनेक बँकेत पीक विमा भरणा होणार नाही, याची बँक अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळते, पिकाच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परीस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, कृषी क्षेत्राच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे आदी उद्दिष्ट या योजनेची आहेत. शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला आहे. जोखिमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी जवळच्या बँकेशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा