महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गडचिरोलीत आपत्ती व्यवस्थापन करताना… शनिवार, १५ जुलै, २०१७
विशेष लेख :

आपल्या खंडप्राय देशात भिन्न प्रकारची भूस्थिती एकाच वेळी आपण बघत असतो. असे असले तरी आपला देश हा मोसमी हवामान प्रदेशात असल्याने आपणाकडे सर्वाधिक आपत्ती या पावसाळयाच्या चार महिन्यात अधिक प्रमाणात असतात. यात वीज कोसळण्याच्या घटनांसोबत नद्यांना अचानक येणारे पाणी तसेच सर्वसाधारण पूरस्थिती, जमीन खचणे किंवा दरड कोसळणे आदींचे प्रमाण या कालावधीत अधिक दिसते.

देशपातळीवर आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे. राज्यस्तर आपत्ती व्यवस्थापनाचा पहिला कायदा 2005 साली महाराष्ट्राने तयार केला. 2005 साली तयार झालेल्या 2 कायद्यांपैकी हा एक कायदा. मात्र याच्या बरोबरीने तयार करण्यात आलेल्या माहिती अधिकार कायद्याइतकी जाणीव जागृती आपत्तीबाबत आजही झालेली नाही. या दृष्टीकोनातून राज्य आणि जिल्हा स्तरावर सातत्याने जनजागरण आणि जागरुकता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

गडचिरोली येथील केंद्रीय आपत्ती नियंत्रण कक्षाने याबाबत आदर्श ठरावी अशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमाणित कार्यपालन पध्दती अर्थात SOP तयार केली आहे.

आपत्तीचे व्यवस्थापन करताना या भौगोलिक क्षेत्रात संभाव्य आपत्ती कोणत्या याचा अभ्यास करुन त्याचे व्यवस्थापन करताना लागणारे मनुष्यबळ आणि साधनसामुग्री यांची केवळ माहिती सादर करणे हा हेतू न ठेवता प्रत्यक्षात आपत्ती आलेल्या परिस्थितीत त्याचे व्यवस्थापन गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात होताना दिसत आहे. हेच गेल्या वर्षभरात प्रतिबिंबीत झाले आहे.

गडचिरोली हा कोकण वगळता महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस असणारा जिल्हा आहे. सोबतच जिल्ह्यात नद्यांचे मोठे जाळे दिसून येते. मध्यप्रदेशात अधिक पाऊस झाला तर ते पाणी इथवर येते. त्यामुळे सर्व धरणांपासून जिल्ह्यात कधी व किती पाणी पोहोचणार आणि स्थानिक नद्या व स्थानिक स्थितीत पाऊस किती पडतो यावर पाण्याचे प्रमाण आणि पातळी यांचा अहोरात्र आढावा घेऊन त्यानुरुप यंत्रणांनी माहिती देण्याचे काम येथील नियंत्रण कक्ष सातत्याने करतो.

जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जिल्ह्यात 2016 साली पावसाळ्याच्या तोंडावर पदभार स्वीकारला. प्रति कार्यालय एक याप्रमाणे 30 दिवस 30 कर्मचारी ही पध्दत आपत्तीसाठी योग्य नाही हे त्यांनी जाणले. त्यानुसार, ज्या कर्मचाऱ्यांना जिल्ह्याचा भूगोल आणि संगणक तसेच अत्याधुनिक संदेशप्रणाली याचे ज्ञान आहे, अशा मोजक्या जाणकार कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्षात नियुक्ती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कृष्णा रेड्डी यांनी या कामी पुढाकार घेऊन पोलिस, आरोग्य तसेच इतर सर्व यंत्रणांची माहिती अद्ययावत करण्याचे महत्त्वपूर्ण काम या निमित्ताने केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या कार्यालयात सुरु करण्यात आला आहे. याखेरीज dmcell नावाने फेसबुक पेज देखील सुरु करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षात जिल्ह्यातील 2 लाख 95 हजार मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्यात आले आहेत. याद्वारे नागरिकांना सूचना देणारे 25 लाखांहून अधिक `एसएमएस` यंदाच्या पावसाळ्यात आजवर पाठविण्यात आले आहेत.

गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन नदीपात्रात `डोंगे ` किंवा होड्या पुराच्या पाण्यात नेण्यावर निर्बंध घालण्यात आला आहे. डोंगा बुडाल्याची एक घटना मागील पावसाळ्यात वडसाजवळील सावंगी गावानजीक वैनगंगेच्या पात्रात घडली होती. त्यातील 10 जणांचे प्राण वाचविण्याचे काम आपत्ती व्यवस्थापनांतर्गत झाले. याखेरीज नदीपात्रात बुडणाऱ्या 2 जणांचे प्राण वाचविण्यात आले.
जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. या पार्श्वभूमीवर स्थानिक भाषांचा वापर करुन ऑडिओ जिंगल्स तसेच पोस्टर, बॅनर्स यांच्या मदतीने जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.

भौगोलिक रचना आणि बारमाही रस्ते नसल्याने काही भागांचा संपर्क पावसाळ्यात राहत नाही. या ठिकाणांवर अन्नधान्य साठा तसेच पुरेशी औषधे यांचा साठा याआधीच उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

पडणाऱ्या वीजेने प्राणहानी होऊ नये यासाठी तीन ठिकाणी वीडा अटकाव यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच प्रसंगी संपर्कासाठी व्यवस्था म्हणून सर्व 12 तहसील कार्यालये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडण्यात आलेली आहेत.

प्रतिबंध हा सर्वोत्तम बचाव अशा आशयाची म्हण इंग्रजीत आहे. मात्र नैसर्गिक आपत्ती त्यापलीकडची बाब आहे. अशी आपत्ती आल्यास किती जलद आपण प्रतिसाद देतो आणि आलेल्या आपत्तीचे व्यवस्थापन किती प्रभावीपणे करतो हे महत्त्वाचे असते.

- प्रशांत दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली
98231 99466
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा