महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नववर्षात नाट्यगृह खुले करण्यासाठी अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा - पालकमंत्री सोमवार, ०४ डिसेंबर, २०१७
जळगाव - नवीन वर्षात जिल्ह्यातील नाट्य रसिकांसाठी नाट्यगृह खुले करावयाचे आहे. येत्या एक महिन्याच्या आत कुठल्याही परिस्थितीत नाट्यगृहाची अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी शहरातील महाबळ परिसरात बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार स्मिताताई वाघ, महापौर ललीत कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सहायक जिल्हाधिकारी जलज शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह सार्वजनिक विभागाचे अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी नाट्यगृहाच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच अपूर्ण असलेल्या कामांची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. अपूर्ण असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदारास दिल्या. सद्यपरिस्थितीमध्ये शहरातील नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. इलेक्ट्रिकची व रंगरंगोटीची कामे सुरु असून ही कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील असे अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.

नवीन वर्षात नाट्यगृह नाट्य रसिकांसाठी खुले करुन पहिले दहा प्रयोग नाममात्र फी घेऊन नाट्य रसिकांना दाखविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्थांची मदत घेण्याचा विचार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा