महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी “वाचन प्रेरणा दिन” साजरा करावा - अ.वा. सूर्यवंशी बुधवार, ११ ऑक्टोंबर, २०१७
उस्मानाबाद : वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार व विकास व्हावा म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी १५ ऑक्टोबर हा दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करावा, असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा. सूर्यवंशी यांनी केले.

भारताचे माजी राष्ट्रपती स्व.डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने १५ ऑक्टोबर हा जयंती दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सार्वजनिक वाचनालयातील तालुकास्तरीय समन्वयकांच्या बैठकीत ते बोलत होते.

श्री.सूर्यवंशी म्हणाले की, १५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांनी वाचन संस्कृतीसंबंधी व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, ग्रंथाचे सामूहिक वाचन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करुन ग्रंथप्रदर्शन, निवडक कथा, कवितांचे अभिवाचन करावे तसेच निबंध स्पर्धा किंवा एखाद्या लेखकाची प्रकट मुलाखत, एखाद्या आवडीच्या पुस्तकावर मनोगत, सलग काही वेळ शांतपणे वाचन, वृत्तपत्रातील अग्रलेख वाचन, लेख वाचन यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करुन या कार्यक्रमांचा छायाचित्रांसह अहवाल dioosmanabad.dol@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्यावर पाठविण्याचे आवाहनही केले.

यावेळी “लोकराज्य” या शासनाच्या मुखपत्राचे नियमित वाचन करणेबाबत तसेच महाराष्ट्र वार्षिकी विशेषांक, महामानव अंकाच्या खरेदी व वाचनाबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच “सुविद्या” पुस्तक भांडार, तुळजापूर यांच्याकडे महाराष्ट्र वार्षिकी व महामानव विशेषांक विक्रीस उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शासकीय ग्रंथालये व वाचनालये हे "लोकराज्यदूत" म्हणूनही उत्साहाने काम करतील असा संकल्पही बैठकीत उपस्थित सर्वांनी केला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा