महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिद्द, चिकाटी व ध्येय निश्चिती या त्रिसुत्रीचा वापर करुन जीवनात यशस्वी होणे शक्य- एस.के. बावस्कर मंगळवार, १३ मार्च, २०१८
जालना : आजचे युग हे स्पर्धेच युग आहे. या स्पर्धेच्या युगात जिद्द, चिकाटी व ध्येय निश्चिती या त्रिसुत्रीचा वापर करुन आपण यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई, धरतीधन ग्रामविकास संस्था, थिगळखेडा व जिल्हा माहिती कार्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने टु साईन सॉफ्टटेक ट्रेनिंग इन्स्टीट्युट, जालना येथे महिला प्रबोधन कार्यशाळा व ग्रामसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

व्यासपीठावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील ॲड सा.मा. पंडित, राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक ॲड.पी.जे. गवारे, महिला व बालकल्याण विभागाच्या श्रीमती जी.पी. हाके, गोपाल चुंबळकर, संस्थेचे सचिव संतोष गरड, श्रीमती कविता सावंत, मिलिंद सावंत, माहिती सहाय्यक अमोल महाजन आदींची उपस्थिती होती.

श्री.बावस्कर म्हणाले की, महिलांच्या उन्नतीसाठी शासनामार्फत अनेकविध योजना राबविण्यात येत आहेत. बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येत असुन महिलांना गटाच्या माध्यमातून लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पंतप्रधान मुद्रा बँक योजनेतून कर्ज घेत आज अनेक महिला यशस्वी उद्योजिक बनल्या असल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपल्या जीवनात उन्नती साधण्याचे आवाहन त्यांनी केले. शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकामधूनही शासनाच्या विविध योजना, मंत्री मंडळाचे निर्णय तसेच विविध विषयावरील विशेषांक, मान्यवरांचे लेख आदी प्रकाशित होत असतात. या मासिकाचे वर्गणीदार होऊन याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.बावस्कर यांनी यावेळी केले.

ॲड.पंडित म्हणाले की, शहरी व ग्रामीण भागातील महिलांच्या उन्नतीसाठी केंद्र व राज्य शासन अनेकविध योजना राबविते. या योजनांची केवळ माहिती नसल्यामुळे महिला या योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. महिलांनी या योजनांची माहिती घेऊन त्या समजुन घेऊन त्यांचा पुरेपुर लाभ घ्यावा. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थीदशेतच आपले ध्येय निश्चित करा व त्या मार्गाने अभ्यास करुन जीवनात यश संपादन करावे असे सांगत पुढची पिढी घडवण्याची ताकद महिलांमध्ये असुन स्वत: बरोबरच इतरांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

श्रीमती हाके म्हणाल्या की, आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. परंतू ग्रामीण भागातील महिला आजही समाजाच्या मुख्य प्रवाहापासुन दूर असल्याचे चित्र आहे. महिलांनी आत्मनिर्भर होऊन समाजाच्या विकासासाठी पुढे येण्याची गरज असुन महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय उभारुन स्वावलंबी होण्याची गरज असल्याचे सांगितले. महिला व बालविकास विभागामार्फत महिलांसाठी तसेच विद्यार्थीनींसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

ॲड.गवारे यांनी कार्यक्रम आयोजनामागचा हेतू विशद करत महिलांसाठी असलेल्या कायद्याची सविस्तरपणे माहिती दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार धरतीधन ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केले. यावेळी उपस्थित महिला व विद्यार्थीनींनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित महिला व विद्यार्थीनींना लोकराज्य अंकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरणही करण्यात आले.

कार्यक्रमास महिला व विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा