महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कबुलायतदार गावकर प्रश्नांसंदर्भात ग्रामस्थांनी सर्वेक्षण व वाटपाबाबत सहकार्य करावे - दीपक केसरकर गुरुवार, ११ ऑक्टोंबर, २०१८
सिंधुदुर्ग : आंबोली, चौकुळ व गेळे या तीन गावातील कबुलायतदार गावकर प्रश्नाबाबत येत्या 19 ऑक्टोबर 2018 पासून आठ दिवस तहसिलदार, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, संबंधित गावच्या वाडीतील ज्येष्ठ ग्रामस्थ यांची समिती वहिवाटदार व त्यांच्या क्षेत्राची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण करतील. या समितीला ग्रामस्थांनी सहकार्य करावे व योग्य माहिती द्यावी. तसेच शेत जमिन वितरणासंदर्भातही या समितीला माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आज येथे आयोजित बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

आंबोली, चौकुळ व गेळे या गावातील कबुलायतदार गावकर प्रश्नासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संबंधित ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश जगताप, उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर, तहसिलदार राजाराम म्हात्रे तसेच संबंधित गावातील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

कबुलायतदार गावकर हा प्रश्न बरीच वर्षे प्रलंबित आहे. याबाबत ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सुयोग्य तोडगा निघण्यासाठी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठविणे आवश्यक असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, संबंधित गावातील वाड्यांची भविष्यातील वाढ लक्षात घेता यासाठी 20 टक्के जमीन राखीव ठेवणे आवश्यक आहे. तसेच या तिन्ही गावात महसूल, पर्यटन, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा या बाबींसाठीही जमीन राखीव ठेऊन त्याचे क्षेत्र निश्चित करणे गरजेचे आहे. यासाठी या तिन्ही गावांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले, शासनामार्फत एम.आर.सॅट संस्थेमार्फत सॅटेलाईट नकाशा करण्यात येईल. प्रत्यक्ष सर्वेक्षण व सॅटेलाईट नकाशा यांच्या समन्वयाने प्रत्येकाचे क्षेत्र निश्चित होईल. शेत जमिनीच्या वितरणाबाबतही ग्रामस्थांनी समितीच्या सहकार्याने वितरणाचे सूत्र निश्चित करावे. यामुळे शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठविणे शक्य होईल.

याबैठकीत ग्रामस्थ सर्वश्री रामचंद्र गावडे, सुनिल नार्वेकर, शशिकांत गावडे, प्रकाश गावडे, लक्ष्मण गावडे, मालू राऊत, जगन्नाथ गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा