महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
देश सेवा हीच सर्वात मोठी सेवा - विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.रवींद्र सिंघल गुरुवार, १३ जून, २०१९


स्वारातीम विद्यापीठात आव्हान-२०१९ राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराचा समारोप समारंभ संपन्न

नांदेड :
कोणतेही काम लहान असत नाही. काम केल्याने माणूस छोटा होत नाही. दहा दिवसाच्या शिबिरात तुम्हाला नवे ज्ञान मिळाले आहे. तुम्हाला नवी उर्जा मिळाली आहे. हे ज्ञान आणि उर्जा देशासाठी वापरा. देशसेवेहून कोणतीच सेवा मोठी नसते, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.रवींद्र सिंगल यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित दहा दिवसीय ‘आव्हान-२०१९’ राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या पारितोषिक वितरण व समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले हे होते. या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई येथील राज्य संपर्क अधिकारी व विशेष कार्य अधिकारी डॉ. अतुल साळुंके, डॉ.विवेक साठे, कर्नल डॉ.ए.व्ही.माने, सोमनाथ गोहिल, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.वसंत भोसले, डॉ.एस.एल.सदावर्ते, डॉ.वैजयंता पाटील, डॉ.गोविंदराव घार, डॉ.वामनराव जाधव, डॉ.अशोक टिपरसे, डॉ.महेश मगर, डॉ.एम.के.पाटील, कुलसचिव डॉ.रमजान मुलाणी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.रवि सरोदे, वित्त व लेखाधिकारी डॉ.गोविंद कतलाकुटे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.शिवराज बोकडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.ज्ञानोबा मुंढे, क्रीडा संचालक डॉ.विठ्ठलसिंह परिहार आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.


डॉ.रवींद्र सिंघल म्हणाले की, नाशिकचा कुंभमेळा आणि नांदेडच्या गुरुता-गद्दी कार्यक्रमाच्या वेळी अधिकारी म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करतांना खूप शिकायला मिळाले. पण अशा कामाच्या वेळी येणाऱ्या संकटाची आपणास कल्पना असते, म्हणून आपण त्यासाठी पूर्वतयारी करू शकतो. पण लातूरला झालेला भूकंप ही सांगून येणारी आपत्ती नसते. अशावेळी कायम दक्ष रहावे लागते. 
तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आहात. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. हे वेगळेपण तुम्ही जपले पाहिजे. तुम्ही समाजाचे नेतृत्त्व केले पाहिजे. ध्येयाशिवाय जगणे भरकटते. तुम्ही ध्येय निश्चित करा आणि परिश्रम करा. ‘कहते है अगर किसी चीज को दिलसे चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है’ हा ओम शांती ओम चित्रपटातील संवाद मला खूप आवडतो. असे सांगताच विद्यार्थ्यांना त्यास टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वयातही मी कामाचे ध्येय निश्चित करतो. पराभव वाट्यास आला तरी ‘आत्मविश्वास’ गमवायचा नाही हे माझ्या अठरा वर्षाच्या मुलीने मला शिकविले असल्याचे श्री.सिंघल यांनी सांगितले.

डॉ.अतुल साळुंके म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनाचे शिबीर खरे तर आता सुरु झाले आहे. तुम्ही आपत्तीत सापडलेल्यांच्या मदतीला धावून जाल तेव्हाच हे शिबीर यशस्वी झाले असे म्हणता येईल. यावेळी डी.आर.एफ.चे पुरुषोत्तम राणा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.अशोक टिपरसे, डॉ.महेश मगर, डॉ.गोविंदराव घार, डॉ.वसंत भोसले यांनीही समायोचित मार्गदर्शन केले. प्रभाकर मळावे (औरंगाबाद), हेमाद्री पांडे (मुंबई) या विद्यार्थ्यांनी शिबिराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ.सुधीर कोचाळ (अकोला) व डॉ.गुंजन (नागपूर) यांनीही मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करतांना, हात हे उगारण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी असतात, या बाबा आमटे यांच्या विधानाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी विद्यार्थ्यांना स्मरण करून दिले. राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीद हे ‘माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी’ असे आहे. त्यामुळे शिबिरार्थी विद्यार्थ्यांची जबाबदारी आता वाढली आहे. हे विद्यार्थी भावी काळात निश्चितच समाजाची सेवा करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.अविनाश कदम यांनी शिबिराच्या अहवालाचे वाचन केले.बक्षीस वितरण आणि सन्मान

दहा दिवसीय शिबिरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संघाच्या व स्वयंसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात उत्कृष्ट शोभायात्रेचा फिरता चषक कोल्हापूर जिल्ह्याच्या संघाने पटकावला. उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकाचा मान श्वेता साठवणे (डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला), चेतना गौतम (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर), ओंकार हराळ (म.फुले कृषी विद्यापीठ, राहुरी), प्रसाद गुल्हाणे (राष्ट्रसंत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती) यांनी पटकाविला. उत्कृष्ट संघ प्रमुखासाठी देण्यात येणाऱ्या फिरत्या चषकाचा मानकरी ठरला, ओंकार वावचौरे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) व अंबिका शर्मा (मुंबई विद्यापीठ, मुंबई). उत्कृष्ट जिल्ह्यासाठी देण्यात येणाऱ्या फिरत्या चषकाचे भंडारा आणि नांदेड जिल्हा हे मानकरी ठरले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सचिन नारंगले व डॉ.महेश जोशी यांनी केले तर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.शिवराज बोकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा