महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कुठलीही खासगी माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये - अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार पाटील शुक्रवार, ०३ जानेवारी, २०२०


सिंधुदुर्ग - सायबर सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी विशेषतः महिलांनी कोणत्याही प्रकारची कौटुंबिक व वैयक्तिक माहिती समाज माध्यमांवर शेअर करु नये असे मत अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार पाटील यांनी व्यक्त केले. कुडाळ येथील बॅ. नाथ पै महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आज सायबर सेफ वुमन अंतर्गत आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेविका संध्या तेरसे, बॅ. नाथ पै संस्थेचे अध्यक्ष उमेश गावळणकर, प्राचार्य अरुण मर्गज, गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख प्रल्हाद पाटील, कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे, सहाय्य्क पोलीस निरीक्षक गायत्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

इंटरनेटच्या माध्यमातून आज माहिती सहज उपलब्ध होत असल्याचे सांगून अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील पुढे म्हणाले की, वैयक्तिक व व्यावसायीक कामांसाठी आज इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. ज्याप्रमाणे हा वापर चांगल्या गोष्टीसाठी होत आहे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या साधनाचा वापर गुन्ह्यांसाठी करताना दिसत आहेत. सायबर गुन्ह्यांची सर्वात मोठी झळ ही महिलांना बसत आहे. .in किंवा .org या सरकारी अधिकृत वेबसाईट आहेत. या व्यतिरिक्त कोणत्याही अनोळखी वेबसाईटला तसेच कोणत्याही लिंक दिलेल्या मॅसेजला रिप्लाय देऊ नये. मैत्री, लॉटरी, नोकरी, लग्न या विषयीचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांनी सावध राहणे गरजेचे आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्विकारू नये, अनोळखी व्यक्तीशी ऑनलाईन संभाषण (चॅटिंग) करु नये, यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. महिलांच्या फेसबूक तसेच इतर समाज माध्यमांवर असलेले फोटो मॉर्फ करुन ते पुन्हा अपलोड करण्याचे गुन्हे घडतात. त्यातून महिलांचा कोणताही दोष नसताना त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पण, बदनामीच्या भितीने महिला अशा प्रकरणांमध्ये तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. त्याचा फायदा गुन्हेगार घेतात व त्यांचे धाडस वाढते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची छेडछाड, अश्लिल मेसेज आल्यास त्याची तक्रार थेट नजीकच्या पोलीस ठाण्यात द्यावी. सायबर सुरक्षेबाबत दक्षता हीच खबरदारी असल्याचे श्री. पाटील म्हणाले.

आमदार वैभव नाईक म्हणाले की, सध्या पोलीस चांगल्या प्रकारे काम करत आहेत. गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी, त्यांचा तपास करण्यासाठी पोलीस सतत कार्यरत आहेत. पण, समाज माध्यमांतून होणारे गुन्हे हे गंभीर आहेत. या गुन्ह्यांविषयी गप्प न बसता पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे. गुन्हेगारापेक्षा गुन्हा सहन करणारा जास्त दोषी असतो. तसेच समाज माध्यमातून होणारी फसवणूक रोखण्यासाठी सावध असावे. मोबाईलचा वापर हा मर्यादित असावा. आपण कसे सुरक्षित राहू याचा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे समाज माध्यमांच्या वापरावर स्वनिर्बंध घालावेत असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी पोलीसांच्या कार्यपद्धतीविषयी माहिती दिली. तर नगरसेविका संध्या तेरसे, महिला दक्षता समितीच्या दिपाली काजरेकर यांनी उपस्थितांना महिलांविषयीच्या गुन्ह्यांच्या स्वरुपाविषयी मार्गदर्शन केले.

सहायक पोलीस निरीक्षक गायत्री पाटील यांनी पीपीटीच्या माध्यमातून सायबर गुन्हे, गुन्ह्यांची पद्धती, सायबर सुरक्षा, सायबर गुन्ह्यांचे प्रकार, सोशल इंजिनिअरिंग, फिशिंग, बँक विषयक फसवणूक, लग्नाच्या आमिषाने फसवणूक, सायबर डिफमेशन, स्टॉकिंग याविषयी माहिती दिली.

सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. बॅ. नाथ पै संस्थेचे अध्यक्ष उमेश गावळणकर व प्राचार्य श्री. भार्गव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक सहायक पोलीस निरीक्षक गायत्री पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता मोरजकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयीन युवक-युवती, महिला, एनजीओ सदस्य व महिला दक्षता समितीच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा