महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
म्हाळुंगे परिसर आदर्श वसाहत म्हणून विकसीत करणार- पालकमंत्री सोमवार, ११ जून, २०१८
पुणे : म्हाळुंगे गावातील पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते बांधणी आणि गावातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करुन, म्हाळुंगे परिसर आदर्श वसाहत म्हणून विकसीत करण्यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत म्हाळुंगे ग्राम पंचायत सक्षमीकरण योजनेंतर्गत घन कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी वितरण कार्यक्रम पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, सरपंच मयूर भांडे, ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री यांच्याहस्ते पाच घंटागाड्या ग्रामपंचायतीला देण्यात आल्या.

श्री.बापट म्हणाले की, म्हाळुंगे गावाच्या आजूबाजूला औद्योगिक वसाहती उभ्या राहत आहेत. त्याचबरोबर हिंजवडी आय.टी.पार्क जवळच आहे. यामुळे गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर रहिवासी इमारती बांधण्यात येत आहेत. याठिकाणी होणाऱ्या बांधकामावरील शुल्कातून म्हाळुंगे गावाची विविध कामे हाती घ्यावी व यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, अशी सूचना यावेळी पालकमंत्री यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना केली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी, म्हाळुंगे गावाच्या परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधले. त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची सूचना केली. कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे आता, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती व्यवस्था निर्माण करावी असे सांगितले.

पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी, घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी उपलब्ध करुन देण्यामागचा हेतू स्पष्ट करुन, म्हाळुंगे गाव व आजूबाजूच्या परिसराच्या विकासासाठी पीएमआरडीए विविध योजना राबविणार असल्याचे सांगितले.

म्हाळुंगे-नांदे-चांदे रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन
पीएमआरडीएतर्फे तयार करण्यात येत असलेल्या म्हाळुंगे-नांदे-चांदे या रस्त्याच्या कामाचे तसेच सुधारणेसंबंधी कामाचे भुमीपूजन आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गिते, हिंजवडी आय.टी.पार्क परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच भागात हिंजवडी आय.टी.पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर चालू असलेल्या पुलाच्या बांधकामाची पाहणी पालकमंत्री यांनी केली. रस्त्याच्या कामासंदर्भात स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांनी अडचणी समजावून घेतल्या.

हिंजवडी आय.टी.इंडस्ट्रीज असोसिएशन पदाधिकाऱ्यांशी चर्चा
हिंजवडी आय.टी.पार्क परिसरात विविध आय.टी.कंपन्या कार्यरत आहेत. येथील उद्योजकांना उच्च दर्जाच्या सोई सुविधा मिळाव्या यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली हिंजवडी आय.टी. इंडस्ट्रीज असोसिएशन आणि विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियमित बैठक घेण्यात येते. या बैठकीमध्ये हिंजवडी परिसरातील उद्योजकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यात येते. इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासमवेत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, एमआयडीसीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्ण, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर तसेच उद्योजक उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा