महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शहरातील 154 इमारतींच्या अवैध बांधकामावर कारवाई सोमवार, १६ एप्रिल, २०१८
पार्किंग समस्येबाबत आढावा बैठक

नागपूर :
शहरातील 10 झोन कार्यालयांतर्गत करण्यात आलेल्या इमारत सर्वेक्षणात 691 पैकी 159 इमारतीमध्ये अवैध बांधकाम करण्यात आले मंजूर नकाशानुसार पार्किंगसाठी राखीव जागेवर करण्यात आलेल्या अवैध बांधकामावर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने दिली.

विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली उच्च न्यायालयातील जनहित याचिका 65/2012 अनुषंगाने शहरातील पार्किंग संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

शहरात धंतोली तसेच रामदासपेठ परिसरात खाजगी रुग्णालयाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या भागात वाहतूकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने धंतोली व रामदासपेठसह शहरातील 10 झोन अंतर्गत विविध इमारतीचे सर्वेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षणात प्राप्त माहिती नुसार 691 इमारतीपैकी 465 इमारतीचे बांधकाम नियमानुसार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय 159 इमारतींच्या पार्किंगसाठी आरक्षित जागेवर नियमबाह्य बांधकाम करण्यात आले आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आतापर्यत 154 इमारतीच्या मालकांना नोटीस पाठवून अवैध बांधकाम काढण्यात आले आहे. याशिवाय 39 अतिरिक्त इमारतीचे अवैध बांधकाम काढण्यात येणार आहे.

धंतोली व रामदासपेठ परिसरातील रुग्णालयाची संख्या कमी करून परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहरात ऑरेंज सिटी मेडीकल हब तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

धंतोली परिसरात सिंगल लेन पार्किंग

वाहतूक विभागाच्या वतीने धंतोली परिसरातील अनधिकृत बांधकाम असलेल्या दवाखान्यांचे शेड काढण्यात आले आहे. एकमार्गी वाहतूक, नो पार्किंग क्षेत्र निश्चित करून सिंगल लेन पार्कींग व्यवस्था कार्यान्वीत करण्यात आली आहे. यशवंत स्टेडियम समोरील भागात त्रिकोणी मैदानात पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे.

धंतोली येथील पार्कींग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने 1447 वाहनांवर नो पार्किंग, 941 वाहनांवर टोईंग, 1514 वाहनांना जामर लावणे, 984 वाहनाचे पिकअप, 2370 वाहनांवर एकमार्गी वाहतूकीची कारवाई करण्यात आली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा