महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गट साधन केंद्राच्या संकेतस्थळाचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१२
शिर्डी : राहाता पंचायत समितीच्या गट साधन केंद्राच्या www.brcrahata.org या संकेतस्थळाचे उद्घाटन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते राहाता पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले. 

यावेळी पंचायत समितीचे सभापती श्रीनिवास त्रिभूवन, जिल्हा परिषद सदस्य राहु लहारे, पंचायत समिती सदस्य दिपक तुरकने, तहसीलदार आप्पासाहेब शिंदे, गट विकास अधिकारी कमलाकर रणदिवे, नगराध्यक्ष सदाफळ, राहाता तालुक्यातील केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक उपस्थित होते.


श्री. विखे म्हणाले, शिक्षण विभागाने सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीच्या दृष्टिने नियमितपणे पालक मेळावे घ्यावेत. त्यात सर्वांगिण विषयावर चर्चा करावी. समाजातील विषमता दूर करण्यासाठी अशा मेळाव्याचा निश्चित उपयोग होईल. समाजात शिक्षकांचे महत्वाचे स्थान आहे. शिक्षकांनी आपापल्या परिसरात, गावात आदर्श निर्माण करावा. विशेषत: मुलींच्या शिक्षणासाठी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. बालपणापासूनच मुलांमुलीचे आरोग्य जपण्याची आवश्यकता आहे.

सध्याच्या टंचाई परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मंत्रिमंडळाने छावण्या सुरु करण्यासाठी मंजुरी दिली आहे. 250 जनावरांपर्यंत एक-दोन छावण्या आता तातडीने सुरु कराव्यात. मंत्रिमंडळाने अट शिथिल केली आहे. टंचाईग्रस्त तालुक्यात आपले नाव नाही म्हणून आपण सवलतीस मुकलो आहोत असे नाही. क वर्ग नगर परिषद हद्दीतही छावण्या सुरु करता येतील. टंचाईच्या सवलती मिळण्यासाठी नियमाची बाधा येणार नाही याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना श्री. विखे यांनी केल्या.

गट साधन केंद्राने सुरु केलेले www.brcrahata.org हे संकेतस्थळ विद्यार्थी, शिक्षक,पालकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या संकेतस्थळावर शालेय पोषण आहार, विद्यार्थी विमा योजना, शिष्यवृत्ती परीक्षा, जनप्रबोधन, शिक्षक प्रशिक्षण, पटसंख्या, पटनोंदणी, अन्य शैक्षणिक वेबसाईटसचे पत्ते, साईदर्शन, राहाता तालुक्याचा इतिहास, जिल्हा परिषद, विषय समित्या, ईस्कूल आदी माहिती देण्यात आली आहे. या शिवाय अहमदनगर जिल्हा परिषदेतील महत्वाचे दूरध्वनी क्रमांक, बांधकाम, पर्यायी शिक्षण, मोफत पाठ्यपुस्तके, विविध अनुदाने, स्कूल रिपोर्ट कार्ड, सावित्रिबाई दत्तक पालक योजना, विषय समित्या, वयानुरुप दाखल मुलांसाठी विशेष प्रशिक्षण आदी महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

 
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा